कचरामुक्त कल्याणसाठी सोसायटीची जबाबदारी तत्सम बिल्डरांनी घ्यावी – आमदार श्री. नरेंद्र पवार

आमदार नरेंद्र पवार यांनी घेतली क.डों.म.पा आयुक्त गोविंद बोडके यांची भेट.

गावकऱ्यांना मच्छीमारीकरिता गौरीपाडा तलाव होणार खुला.

कल्याण शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय योजना करण्याबाबत आयुक्तांना केली सूचना.

(श्री. सतिष एस राठोड) ✍

कल्याण :- कल्याण डोंबिवली महापलिकेने २ हजार चौरस मीटर आकाराच्या बिल्डरांना बांधकाम परवानगी देताना पर्यावरणाच्या दृष्टीने कचऱ्याची विल्हेवाट त्याच सोसायटीत लावणे बंधनकारक केले होते. महापालिका हद्दीतील बड्या बिल्डरांनी कचरा विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प राबविण्याची हमी देऊन बांधकाम परवानग्या घेतल्या मात्र प्रकल्प राबविलेले नाही. आता महापालिकेने सोसायटीत राहणाऱ्या नागरीकांना सक्ती करीत आहे. ही सक्ती नागरीकांना न करता बिल्डरांना करण्यात यावी. त्यांनी प्रकल्प राबविला नसेल तर त्यांच्या अन्य ठिकाणी सुरु असलेल्या विकास कामाची परवानगी रद्द करण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे. याचा गांभीर्याने विचार करत तातडीने निर्णय घेतला जाईल असे आयुक्त श्री. बोडके यांनी सांगितले आहे. गौरीपाडा तलाव मच्छीमारीसाठी गावकऱ्यांना देण्यात यावा याकडे लक्ष वेधले असता आयुक्तांनी मच्छीमारीकरता तलाव खुला करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीतच दिले.

कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांच्या पाठपुरव्याने अनेक ठिकाणी विकासकामांचे जोरदार कामे सुरू आहेत. मात्र महापालिका प्रशासनाच्या धीम्या कारभारामुळे यात विलंब होत असून महापालिका क्षेत्रात अनेक प्रभागातील नागरिक मुलभूत व पायाभूत सुविधा मिळण्यापासून वंचित राहत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. कल्याण पश्चिममधील नागरिकांना भेडसावत असणाऱ्या नागरी समस्यांबाबत कडोंमपा आयुक्त गोविंद बोडके यांची आज श्री. पवार यांनी भेट घेऊन त्यांच्याशी सबंधित समस्यांविषयी चर्चा केली. लवकरात लवकर सर्व समस्यांचे निराकरण करून विकासकामे लवकर मार्गी लावावित अशी आग्रही मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना केली आहे. या आधीही श्री. पवार यांनी मतदार संघातील समस्या आणि महापालिका हद्दीतील कामांच्या संदर्भात ०३/०८/२०१८ ला बैठक घेतली होती. या बैठकीस अधिकारी वर्ग सुद्धा उपस्थित होते. सदर बैठकीतील प्रलंबित विषयांसह आदी विषयावर चर्चा करून ताबडतोब नागरिकांना दिलासा मिळावा अशी मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान केली. सध्या कल्याण शहराला भेडसावणारा सर्वात मुख्य प्रश्न म्हणजे वाहतूक कोंडी. शहरातील अत्यंत महत्वाचा असणारा असा पत्री पुलाच्या एकच मर्गिकेवरून सध्या दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे त्याचा ताण संपूर्ण शहराच्या वाहतुकीवर येत असून वाहतूकोंडीमुळे कल्याणकर जेरीस आले आहेत. यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाला सुनावले. यासंदर्भात सबंधित विभगांबरोबर बैठक आयोजित करून होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय योजना करण्याची आग्रही मागणी केली. त्याचप्रमाणे आधारवाडी डंपिंग ग्राउंड बंद करण्याबाबत महापालिका प्रशासनाने सद्यस्थितीत काय उपाय योजना सुरू आहेत याचीही विचारणा केली आहे. आधारवाडी डंपिंग ग्राउंड बाबत नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत प्रशासनाने न पाहता युद्धपातळीवर काम करण्याची अपेक्षा आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली.

दरम्यान आमदार नरेंद्र पवार यांनी सदर बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा केली.

१) मोहने येथील फ्लायओव्हरचे रखडलेले काम त्वरित सुरु करण्यासाठी फ्लायओव्हरचे कंत्राटदारासोबत मिटिंग लावण्याबाबत चर्चा झाली.

२) गौरीपाडा तलाव येथील शुशोभिकरण करण्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्यासाठी गावकऱ्यांच्या असलेल्या समस्येबाबत गौरीपाडा येथील पंचकमिटी व महापालिका यांच्यासोबत बैठक आयोजित करणेबाबत चर्चा झाली.

३) बी.एस.यु.पी. प्रकल्पामध्ये रस्ते रुंदीकरणात बाधित झालेल्यांना पुनर्वसित करणे.

४) गोल्डन पार्क समोरील दुर्गाडी बिर्ला कॉलेज मुख्य रस्ता ते वर्टेक्स सॉलीटेअर को.ऑप. सो. पर्यंतचा ५० मीटर डीपी रोड तयार करणे.

५) काळा तलाव सुशोभीकरण टप्पा क्र. २ ची अंमलबजावणी करण्याबाबत. (सहजानंद चौक ते मच्छीमार सोसायटी पर्यंत रस्ता रुंदीकरण करणे.

६) २७ गावांमधील कर कमी करणेबाबत चर्चा करण्यात आली.

७) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर कल्याण विभाग (मौजे सापाड/ वाडेघर, ता. कल्याण जि.ठाणे) या भागाचा टप्पा टप्प्याने सुयोनियोजित विकास करण्यात संदर्भात चर्चा करण्यात आली.

८) दिव्यांग व्यक्तींच्या ३ % बजेट मधील तरतूद मधून दुर्गाडी गणेशघाट येथील आरक्षित भूखंडावर दिव्यांग व्यक्तींसाठी विरंगुळा केंद्र बांधणे.

९) डीपी मधील पुष्पराज हॉटेल ते संतोषीमाता रोड चे काम लवकरात लवकर मार्गी लावणेबाबत सूचना करण्यात आली. आदी विषयांवर चर्चा करत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त श्री. गोविंद बोडके यांनी आमदार श्री. नरेंद्र पवार यांना दिले.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्री. प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. अर्जुन म्हात्रे, नगरसेवक श्री. दया गायकवाड, श्री. गणेश काळण, श्री. प्रवीण हेंद्रे, भाजपा शहर सचिव श्री. सदा कोकणे, भाजयुमो शहराध्यक्ष श्री. भगवान म्हात्रे, श्री. मयुर पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते.