नेमाडे प्रकरणी तांडा सुधार समितीचे आमदारांना पत्र

नेमाडे प्रकरणी तांडा सुधार समितीचे आमदारांना पत्र

प्रति
१. मा. संजय राठोड जनप्रतिनिधी तथा वनमंत्री महाराष्ट्र राज्य.
२.मा.आ. हरिभाऊ राठोड, जनप्रतिनिधी महाराष्ट्र विधानपरिषद.
३. मा.आ निलंय नाईक जनप्रतिनिधी विधानपरिषद महाराष्ट्र.
४.मा.आ.इंद्रनील नाईक जनप्रतिनिधी विधानसभा महाराष्ट्र.।
५.मा.आ.तुषार नाईक जनप्रतिनिधी विधानसभा महाराष्ट्र.
६. मा.आ.राजेश राठोड जनप्रतिनिधी विधानपरिषद महाराष्ट्र.

विषय :- लेखक, श्री. भालचंद्र वनाजी नेमाडे द्वारा लिखित, “हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ” या कादंबरीत लभान- बंजारा समाजातल्या स्त्रियांबद्दल जाणीवपूर्वक आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल या कादंबरीचे लेखक श्री. भालचंद्र नेमाडे व प्रकाशक, हर्ष भटकळ पॉप्युलर प्रकाशन, मुंबई या दोघांवर शासनातर्फे गुन्हा दाखल करण्यासंदर्भात, या गंभीर विषयाच्या अनुषंगाने या कादंबरीच्या विक्रीवर निर्बंध आणण्याच्या बाबतीत तसेच प्रस्तुत लेखकाला मिळालेला “ज्ञानपीठ पुरस्कार” परत घेण्यासंदर्भात जनप्रतिनिधी म्हणून शासन दरबारी आपला आवाज बुलंद करण्याबाबत विनंती.

महोदय,
उपरोक्त संदर्भांकित देशपातळीवरील समस्त लभान – बंजारा समुदायाच्या गंभीर सामाजिक विषयाच्या अनुषंगाने बंजारा/ लभान समाजाचे वैचारिक प्रतिनिधी म्हणून अ.भा. तांडा सुधार समिती आवणास नम्र विनंती करते की, ”हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ” ही कादंबरी श्री. भालचंद्र नेमाडे रा. सांगवी ता. यावल जि.जळगाव (खानदेश) महाराष्ट्र राज्य यांनी लिहिलेली असून या कादंबरीची पहिली आवृत्ती ही भटकळ पॉप्युलर प्रकाशन, मुंबई द्वारा जुलै २०१० मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. या कादंबरीला २०१४ सालचा साहित्याच्या क्षेत्रांतील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा “ज्ञानपीठ पुरस्कार” २०१५ साली मिळालेला आहे.
या कादंबरीत हरिपुरा या लभान अर्थात बंजारा समाजाच्या तांड्याचे वर्णन लेखकाने केले असून या समाजातील स्त्रियांविषयी अत्यंत अश्लील व बिभत्स स्वरूपाचे लेखन करून त्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील जवळपास बारा कोटी बंजारा समाजाच्या भावना दुखविण्याचे कार्य लेखकाने हेतुपुरस्सर केल्याचे कादंबरीतील लिखाणावरून स्पष्ट झाले आहे. अशा आक्षेपार्ह तथा अवास्तविक लेखनामुळे समाजातील सांस्कृतिक मूल्याला ठेस पोहचल्याने लभान- बंजारा समाजात तीव्र रोष निर्माण झाला असून देशभरातील समाजासाठी ही अत्यंत दुर्दैवी व निंदनिय घटना ठरली आहे. या कादंबरीच्या अत पासून ईत पर्यंत स्त्रीयांच्या माध्यमातून बंजारा समाजाचे चरीत्रहनन लेखकाने केलेले असून कादंबरी प्रकाशित करून सर्वत्र प्रसारित करण्याचे कार्य प्रकाशकांनी केले आहे.
” हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ” ही त्रिखंडात्मक कादंबरी असल्याचा उल्लेख स्वत: लेखकांनी आजवर अनेकदा केलेला आहे. जर अशा प्रकारचा उल्लेख स्वतः लेखकच करीत असेल तर अपूर्ण कादंबरीच्या पहिल्याच खंडाला ज्ञानपीठ पुरस्कार कसा देण्यात आला? पुरस्कार निवड समितीला या कादंबरीतून विशिष्ट समाजाबद्दल व त्या समाजातील स्त्रियांबद्दल लेखकाने दूषित भावनेतून लिखाण केल्याचे कसे दिसले नाही? या कादंबरीतून समस्त लभान अर्थात बंजारा समाजाच्या स्रियाबद्ल नामुष्कीचे लिखाण करून या स्वाभिमानी समाजाच्या अस्मितेला दुखण्याचे, अपमानीत करण्याचे आणि चेतवण्याचे जाणीवपूर्वक कार्य लेखकाने केले आहे. आज लेखक, श्री भालचंद्र नेमाडे व प्रकाशक यांच्या विरोधात लभान- बंजारा सामाजाच्या तिव्र भावना लक्षात घेता व समाजाकडून कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडण्यापूर्वी तात्काळ लेखक व कादंबरीच्या प्रकाशकाला अटक करून, या कादंबरीला चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्यासाठी राज्य सरकारने भारत सरकाराला /ज्ञानपीठ पुरस्कार समितीला शिफारस करून तात्काळ कादंबरीच्या विक्रीवर बंदी आणावी. यासाठी एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून आपण महाराष्ट्र सरकारला भाग पाडणे अपेक्षित आहे. आपल्या आईच्या पूर्वजांच्या अब्रूपेक्षा कोणतेही पद मोठे होऊ शकत नाही. जर शासन आपले म्हणणे ऐकायला तय्यार नसतील तर आपण राजीनामा देऊन बाहेर पडावे. समाज आपल्याला परत आमदार बनविल्या शिवाय राहणार नाही. म्हणून विषयाचे गांभीर्य लेक्षात घेऊन शासन स्तरावर कठोरातील कठोर आवश्यक ती तत्काळ कार्यवाही करावी यासाठी आपण प्रयन्त करणे अपेक्षित आहे
धन्यवाद !
नामा बंजारा/जाधव अखिल भारतीय तांडा सुधार समिती.