हरितक्रांतीचे प्रणेते, मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कार्याचा आढावा
मानवता, न्याय व समतेसाठी झुंज देणारे जे महामानव झाले, त्यात माहानायक वसंतराव नाईक यांचे अगक्रमाने आहे. हरितक्रांतीचे शिल्पकार व बंजारा समाजाला आधुनिक जगाची ओळख करुन देणा-या तसेच सतत अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविलेल्या दिवंगत मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची बुधवारी दि. 1 जुलै रोजी 103 वी जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमाने साजरी केली जात आहे. हरित क्रांतीचे प्रणेते, थोर नेते वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा…
वसंतराव नाईक यांचा जन्म बंजारा समाजामध्ये सौ. होनुबाई फुलसिंग नाईक यांच्या पोटी दि. 1 जुलै 1913 रोजी गहुली (ता. पुसद, जि. यवतमाळ) या गावी झाला. वसंतराव नाईक यांचे आजोबा चतुरसिंग (राठोड) नाईक यांनी गहुली हे गाव वसविले. चतुरसिंग हे तांड्याचे प्रमुख होते. म्हणून त्यांना लोक नाईक म्हणत. वसंतरावाचे बालपण गहुली गावीच गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पोहरादवी, उमरी, भोजला, बान्सी या ठिकाणी झाले. त्या काळी वाहनांची सोय नसल्यामुळे ते चार-पाच मैल चालत जाऊन मोठ्या जिद्दीने व कष्टाने शिक्षण घेतले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण अमरावती व नागपूर येथे पूर्ण केले. तत्कालीन नागपूर जुन्या मध्यप्रदेशाची राजधानी होती. नागपूर शहराचे प्रभाव वसंतरावांच्या जिवनात फार महत्त्वाचे ठरले. तेथे त्यांच्यात अमुलाग्र बदल होत गेला. वाचनाची उदंड आवड निर्माण होवून महात्मा फुले व अन्य समाजसुधारकांचे वाचन केले. त्यांनी नागपूरच्या मॅारिश कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या महाविद्यालयात विविध जातीचे धर्माचे विद्यार्थी होते. त्यांचा त्यांच्याशी संपर्क आला. त्यातूनच समाजिक कार्याची आवड निर्माण होत गेली. मुळातच लहानपणापासून चाणाक्ष बुध्दी व वाकपटुता अंगी असल्याचे पुढील व्यक्तीवर प्रभाव पडत असे. सन 1933 साली नागपूर येथील नील सिटी हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षा वसंतराव नाईक उत्तीण झाले.
नागपूर विद्यापिठातून सन 1937 साली बी.ए. ची पदवी घेतली. पुढे 1940 साली नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयातून एल.एल.बी शिक्षण घेऊन कायद्याची पदवी मिळवली. सन 1941 साली प्रारंभी अमारावतीचे प्रख्यात वकील कै.बॅ. पंजाबराव देशमुख यांच्याबरोबर व नंतर पुसद येथे स्वतंत्रपणे वकीली व्यवसायास सुरुवात केले. सर्वांचे विरोध पत्करुन दि. 16 जुलै 1941 रोजी त्यांनी बाह्मण समाजातील वत्सला घाटे हिच्याशी आंतरजातीय विवाह केला. दोघांच्याही परिवारातुन आंतरजातीय विवाहास कडाडुन विरोध होता. दोघानीही समाजाची पर्वा न करता समाज परिवर्तनाचा हा मार्ग त्यांनी निर्माण केला. वकीली व्यवसायात त्यानी दिन-दुबळ्या, गोर-गरिबांना मदतीचा हात देऊन विविध अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. यात त्यांना मोठे यश आले.
डॉ. पंजाबराव देशमुख या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली एक धडाडीचे समाज कार्यकर्ता म्हणून वसंतराव नाईक यांची संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात ख्याती पसरली. या काळात शेतक-यांच्या फायद्याचे 74 कलम पास व्हावे, यासाठी शेतक-यांत मिळून प्रचार केला. सन 1943 साली पुसद कृषी मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. सन 1946 मध्ये त्यांनी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. वसंतराव नाईक यांचे राजकारण हे मूळक्षेत्र नसताना देखील जनमानसाच्या विश्वासातून सन 1950 पर्यंत तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. याचवर्षी पुसद हरिजन मोफत वसतीगृहाचे व दिग्रस राष्ट्रीय मोफत छात्रालयाचे नाईक हे अध्यक्ष होते. त्यावेळी विदर्भ प्रतिक अध्यक्ष बियागीकडे होते. सन 1946 मध्ये पुसद नगरपालिका निवडणुकीमध्ये कॉंगेसच्यावतीने निवडणुक लढविली त्यात वसंतराव नाईक विजयी होवून त्यांची पुसद नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत वसंतराव नाईक हे 12 हजार मतांनी निवडून आले. यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून मध्यप्रदेश विधानसभेवर निवडून आले तसेच मध्यप्रदेश मंत्रिमंडळात महसूल उपमंत्री झाले. सन 1951 साली ते मध्यप्रदेश सहकारी मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. याचवर्षी विदर्भ प्रदेश समितीचे व कार्यकारिणीचे सदस्यपदी निवड झाली. सन 1956 साली भाषावार प्रांत रचना होईपर्यंत त्यांनी उपमंत्रीपदाची धुरा सांभाळली. त्यांनी महसूल खात्याची जबाबदारी अत्यंत हुशारीने पार पाडली. दि. 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषीक मुंबई राज्याच्या मंत्रीमंडळात सहकार, कृषी, दुग्धव्यवसाय या खात्याचे मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. त्यावेळी यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. अखिल भारतीय कॉंग्रेसचे तसेच महाराष्ट्र विभागीय कॉग्रेस समितीचे व कार्यकारणीच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली.
सन 1955 साली वसंतराव नाईक यांनी यवतमाळ जिल्ह्यातून व विदर्भातून हजारो एकर जमीन भुदानासाठी मिळवून दिले. याच कालावधीमध्ये इंदिरा गांधी व डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पाच हजार एकराचे भुदान केले. तत्पुर्वी अखिल भारतीय कॉंग्रेस अध्यक्ष यु.एन. टेंबर यांच्या हस्ते पुसद तालुक्यातील सात हजार एकर जमीन भुदान केले. सन 1957 च्या दुस-या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी दत्तराम देशमुख यांचा अठरा हजार मतांनी पराभव केला व त्यांची पुसद मतदार संघातून दुस-यांदा निवड होवून यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात वसंतराव नाईक यांची कृषी मंत्री म्हणून निवड करण्यात आली. तेंव्हापासून कृषी क्षेत्रात परिवर्तनाला सुरुवात झाली. सन 1958 साली जपानला गेलेल्या आंतरराष्ट्रीय राईस कमिशनच्या भारतीय शिष्टमंडळात समावेश करण्यात आला व त्यांनी जपानला भेट दिली. टोकीयो येथे एफ.ए.ओ. च्या बैठकांना ते हजर होते. ते दि. 14 सप्टेंबर 1959 ला चीन सरकारच्या निमंत्रणावरुन चीन भेटीला रवाना झाले. त्यानंतर त्यांनी सन 1958 साली जपानचा दौरा केला.सन 1959 साली गोर-गरीबांच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून, फुलसिंग नाईक महाविद्यालयाची पुसद येथे स्थापना केली. दि. 1 मे 1960 रोजी मराठी भाषेचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक महाराष्ट्राचे महसुलमंत्री होते. त्याच काळात म्हणजे दि. 3 सप्टेंबर 1960 रोजी नाईक यांचे वडील फुलसिंग नाईक यांचा मृत्यू झाला. ही बातमी समजताच हे पुसदला निघाले, रस्त्याने जाताना दुष्काळी कामाबाबत अधिका-यांना सूचना देत वडिलांच्या मृत्यूपेक्षा गोर-गरीब जनतेचे दुःख मोठे आहे, असे समजून यवतमाळ जिल्ह्याचा दुष्काळी दौरा केला. सन 1962 साली झालेल्या निवडणुकीत त्यांच्या प्रतिस्पर्धी सौ. नलिनीबाई यांचा 17 हजार मतांनी नाईक यांनी पराभव केला व पुसद मतदारसंघातून तिस-यांदा निवड होवून त्यांची पुन्हा महसूल मंत्री म्हणून निवड करण्यात आली.
यशवंतराव चव्हाण हे भारताचे संरक्षणमंत्री झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे सुत्रे दादासाहेब कन्नमवार यांच्या हाती आले. परंतु एक वर्षानंतर म्हणजे 1963 साली दादासाहेब कन्नमवार यांचे निधन झाल्यामुळे वसंतराव नाईक यांची बहुमताने मुख्यमंत्रीपदी निवड झाली. सन 1964 साली त्यांनी युगोस्लाव्हिया या देशाचा दौरा केला. सन 1966 साली एक नवा इतिहास महाराष्ट्रात घडला, ते म्हणजे 1 मे रोजी मराठी ही भाषा महाराष्ट्राची भाषा म्हणून घोषित करण्यात आली व महाराष्ट्र राज्याचा कारभार मराठी भाषात सुरु झाला. सन 1965 साली भारत-पाक संघर्ष सुरु होताच दि. 9 ते 11 सप्टेंबरला मुंबईत स्फूर्तिदायक व मार्गदर्शक भाषणे दिली. त्यामुळे महाराष्ट्रात चैतन्यदायी वातावरण निर्माणे झाले. नंतर काही महिने युध्द सज्जतेसाठी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. याच वर्षी शेती उत्पादनाच्या नव्वा कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांचा दौरा त्यांनी केला. सन 1966 साली अवर्षणामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. संकटात सापडलेल्या शेतक-यांना हिंमत देण्यासाठी राज्यातील दुष्काळ जिल्ह्यांत झंझावती दौरा त्यांनी केला.
सन 1967 साली सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभावी प्रचारासाठी महाराष्ट्रात दौरा केला. या निवडणुकीत विधानसभेवर पुसद मतदारसंघातून चौथ्यांदा निवड होवून दि. 6 मार्च 1967 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दुस-यांदा वसंतराव नाईक यांची एकमताने निवड झाली. कृषी क्षेत्राविषयी अत्यंत आवड असल्यामुळे नाईक यांच्या प्रयत्नामुळे 15 लाख टन धान्य अधिक उत्पादन वाढले. त्यातून दि. 19 एप्रिल 1969 साली पंजाबराव कृषी विद्यालयाची स्थापना करुन शेतकी व्यवसायात भर टाकण्यात मदत केली. 10 मे 1968 रोजी गुन्हेगारांना मुक्त जगता, यावे यासाठी पहिले खुले कारागृह पैठण येथे स्थापन केले व गुन्हेगारांना माणूस म्हणून जगण्यास मार्ग दाखविला. सन 1970 साली शहरी जीवनात वाढ व्हावी, गोरगरीब मध्यमवर्गीयाना शहरात नौकरी करता यावी, म्हणून शासनातर्फे लोकांच्या मदतीला हातभार म्हणून 18 मार्च रोजी सिडकोची स्थापना केली. त्यातून लोकांना निवारा मिळाला. याचवर्षी अमेरिकेच्या निमंत्रणावरुन अमेरिकेचा दौरा व युरोपीय देशांना भेटी त्यांनी दिले. सन 1972 साली पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभर दौरा करुन पुसद मतदार संघातून वसंतराव नाईक यांची पाचव्यांदा निवड होवून दि. 14 मार्च 1972 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिस-यांदा निवड झाली. सन 1972 ते 1973 साली राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. लोकांचे भुकेने बेहाल, जनावरांचा चारा यासारख्या गंभीर समस्या नाईक यांच्या समोर आ वासून उभ्या होत्या. मात्र त्या अडचणीवर त्यांनी मात करुन विविध कामे सुरु केली. मजुरदार लोकांना सुगडी खाण्यास देऊ केले. विविध योजना राबवून जनतेला दिलासा दिला. राज्यातील नऊ जिल्ह्यातील दुष्काळ हा देशातील इतर कोणत्याही भागातील दुष्काळापेक्षा अधिक तीव्र स्वरुपाचा होता. त्यावेळी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात फिरुन दुष्काळी कामाला मोठ्याप्रमाणावर चालना दिली. दि. 20 फेब्रुवारी 1975 साली वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. दि. 12 मार्च 1977 साली वसंतराव नाईक यांनी वासीम मतदार संघातून खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. वसंतराव नाईक केंद्रात जावूनही जनतेला विश्वासात घेऊन विविध विकास कामे पार पाडली. डोंगर कपारीत व रानोमाळ भटकणा-या बंजारा समाजाला आधुनिक जगाची ओळख करुन दिली. समाज जागृतीचा पहिला अध्याय त्यांनी समाजाला दिला. त्यांचे हे विचार बंजारा समजापुरते मर्यादित न राहता प्रत्येक जाती, धर्म, विविध समाजात पोहचले आणि प्रत्येक ठिकाणी एक माणुस म्हणून पुढं यावे, हीच त्यांची इच्छा होती. दि. 18 ऑगस्ट 1979 रोजी वसंतराव नाईक व सौ. वत्सला नाईक या उभयंतांनी सिंगापूर यात्रा करत असताना वसंतराव नाईक यांचे 66 व्यावर्षी निधन झाले..
हे बंजारा महानायकाला माझ्या शब्दरूपी मनपूर्वक वदंन देऊन..
सौजन्य:- गोर कैलास डी.राठोड
स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत,संस्थापक/अध्यक्ष
जय सेवालाल बंजारा सेवा संस्था रजि.(NGO),
मो.9819973477
TAG: Vasantrao Naik, Banjara CM Vasantrao Naik, Lamani, Lambani