बंजारा लाईव्ह (सतिष एस राठोड)
बदलापूर:- गोर बंजारा प्रतिष्ठान, बदलापूर आयोजित पारंपारिक तिज उत्सव व विद्यार्थी गुणगौरव सोहळा दि. २६ रोजी गायत्री गार्डन कात्रप बदलापूर येथे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी, शहीद मेजर कौस्तुभ राणे, या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
नगरसेवक कॅ.आशिष दामले व त्यांच्या नगरसेवक सहकार्यांनी बदलापूर परिसरात वास्तव्यास राहणाऱ्या बंजारा समाजाला शासन पातळीवर येणाऱ्या अडीअडचणीला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांचे मंदीर बांधण्यासाठी व वाचनालयासाठी जागा उपलब्ध असून ती जागा बंजारा समाजाला लवकरच सुपूर्द करण्यात येईल असे आश्वासनही दिले.
विद्यार्थी गुणगौरव सोबतच बंजारा समाजात उत्कृष्ठपणे समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांचे बंजारा समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष सत्कारमूर्ती म्हणून मा. डॉ. कैलास पवार ( जिल्हा शल्य चिकित्सक ), मा. डी. सी राठोड (उप प्रमुख कामगार अधिकारी,BMC) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख मान्यवरांचे सत्कारही करण्यात अाले.
पारंपारिक रिती-रिवाजात, बंजारा वेशभुषात व बंजारा बोली भाषेत गाणी म्हणत महिलांनी सहभाग घेतले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बंजारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.अमरसिंग राठोड होते. उद्योजक समाजसेवक मा. शंकर पवार यांनी सांगितले कि, बंजारा समाजातील गोर गरीबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यायला हवी. समाजाला जर प्रगती पथावर घेऊन जायचे असेल तर, त्यासाठी शिक्षणाचे महत्व कळून घ्यावे लागेल.
त्यानंतर पुणे बार अससोसिएशनचे सदस्य रमेश राठोड यांनी बंजारा समाजातील तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये. आपण हे केले तर नक्कीच समाजाचे नाव उज्वल कराल अशी अपेक्षा करतो असे सांगितले.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नगरसेवक कॅ. मा. आशिष दामले, मा. संभाजी शिंदे, नगरसेविका सौ. शीतल राऊत, सौ.प्रमिला पाटील, मा. नरहरी पाटील, मा. अशोक चव्हाण होते.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गोर बंजारा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
समाजसेवक व बंजारा समाजातील बंधु-भगिनी या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्यामुळे तिज उत्सव खुप आनंदोत्साहात साजरा करण्यात आला.