प्रचंड बुद्धिमत्ता , कुशल संघटक, संयमी राजकारणी, एक चांगले व्यक्तीमत्व, शेती हा ध्यास व श्वास तसेच जनसामान्यांविषयी कळवळा असे अनेक गुणांनी परिपूर्ण असलेले. वसंतराव नाईक साहेब म्हणजे कार्यकतृत्वाचे मोठे विद्यापीठच होते. त्यांच्या कार्यकालामध्ये जे काही निर्णय घेतले ते आपल्या राज्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरले. नाईक साहेबांना शेती विषयी जशी आत्मियता होती तशी शिक्षणा विषयी देखील त्यांना अत्यंत कळवळा होता. तसेच १९७२ च्या दुष्काळामध्ये त्यांनी शाळा, कॉलेजच्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शालेय फी पूर्णपणे माफ केली व कॉलेज मधील विद्यार्थ्यांना रोजगार हमी योजने अंतर्गत अर्धवेळ काम करण्याची देखील मुभा दिली होती. शेती उद्योग, शिक्षण, पाटबंधारे याबरोबर नाईक साहेबांनी आपल्या पणाने माणसे जोडण्याचे मोठे कार्य केले.
त्यावेळचे विरोधी पक्ष म्हणजे खुप वेगळे होते अंगार म्हटले तरी चालेल, पण सुसंस्कृत राजकारण कसे करावे याची जाण त्यांना खुप होती. तसेच विरोधी पक्ष नेत्यांशी जिव्हाळ्याचे मैत्रीचे आणि अत्यंत संवेदनपूर्ण संबंध ठेवले होते.एकदा मृणाल गोरे ताई यांनी पुसद या गावी भेट दिली. ती बातमी जेव्हा नाईक साहेबांना कळाली तेव्हा साहेब भेटले त्यांना आणि म्हणाले “अहो ताई ” तुम्ही माझ्या गावी पुसदला जाऊन आल्या, आणि तुम्ही मला भावाला कळविले नाही. हा एक नाईक साहेबांचा आत्मियतेचा, चांगल्या पणाचा भाग होता. त्यामुळे विरोधी पक्षाला त्यांच्यावर बोलणे, टिका करणे खुप अवघडून जायचे. सुसंस्कृतपणे वागणे, बोलणे त्यामुळे विरोधी पक्षाला काही जागा ठेवत नव्हते.
त्यावेळचे विरोधी पक्ष नेते धोटे साहेबांची आई आजारी पडली, त्यावेळी धोटे साहेब तुरुंगात होते. त्यांना पॕरोलवर सोडण्यात आले. येरवडा जेलमधून जेव्हा बाहेर निघाले तेव्हा त्यांच्यासाठी अॅम्बेसिडर गाडी उभी होती. त्यांना काहीच कळेनासे झाले. जेलमधून का सोडले, कशासाठी सोडले. नंतर त्यांना सांगण्यात आले कि, तुमची आई आजारी आहे. नागपूरला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे व तुम्हाला नागपूरला जायचे आहे. त्यांनी ड्रायव्हरला विचारले कि, गाडी कोणी पाठविली. ड्रायव्हरने उत्तर दिले कि, ते मला देखील माहीत नाही, मुंबईला चला, व मुंबईला पोहचताच नागपूरला जाण्यासाठी विमानाचे तिकिट तयार होते. तसेच त्यादिवशी रात्री नाईक साहेब नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये पोहचले व धोटे साहेबांच्या आईच्या तब्येतीची विचारपूस केली. व धोटे साहेबांना म्हणाले, राजकारणातला विरोध राजकारणात राहील, माणूसकीत विरोध नसल्याचे काहीच कारण नाही. आईची पूर्णपणे सेवा करा. म्हणजेच अशा माणूसकीला तोड नाही.
तसेच यवतमाळचे एक लोकल स्थानिक पत्रकार नेहमी नाईक साहेबांच्या विरूध्द बातम्या लिहायचे पण एक दिवस त्यांना जाहिरात द्यायचा प्रश्न आला. प्रसिद्धी खात्याने सांगितले कि, साहेब ते पत्रकार नेहमी आपल्या विरोधी बातम्या लिहितात, त्यांना जाहिरात द्यायची नाही. नाईक साहेब म्हणाले का नाही द्यायची, द्या त्यांना जाहिरात, विरोधात लिहिणे त्याचा जाहिरातीशी काहीही संबंध नाही. आणि त्यांना जाहिरात सुरू केली साहेबांनी.शेतकरी जगला पाहिजे यासाठी पण त्यांनी अनेक धोरणे बनवली. त्यातच त्यावेळी जुगार, मटक्यामुळे हजारो कुटुंब उध्वस्त झालेत. जुगार, मटक्याला पूर्णपणे आळा बसविण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने १ रुपयाची लॉटरी सुरू करण्यात आली, पण दिग्गज वृत्तपत्रांनी साहेबांच्या भूमिकेला विरोध दर्शविला व अग्रलेख लिहिले गेले. तरीही साहेबांनी कोणाशीही प्रतिवाद केला नाही. म्हणाले हजारो मजूर कारखान्यातून बाहेर पडल्या नंतर मटका, जुगाराच्या मागे लागतात व बर्बाद होऊन जातात. त्यांच्याकडून १ रुपये मी राज्याच्या विकासासाठी घेतोय. आणि त्यातल्या १०० लोकांना तरी बक्षीस मिळणार आहे. हजारो कुटुंबांना जसे ज्वारी देऊन जगवले, तसे जुगाराच्या नादी लागलेल्या लाखो लोकांना चुकीच्या रस्त्यावरून चांगल्या रस्त्यावर आणून ठेवले आहे. व या योगदानाबद्दल महाराष्ट्रात फार तर त्यांची दखल घेतली गेलेली नाही. तसेच मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान आज गोर गरीबांच्या कामी येत आहेत. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर विराजमान होते. तसेच काही काळानंतर राजीनामा दिला, व शांत न बसता शेतकऱ्यांप्रति कळवळा असल्यामुळे शेती विषयक एक अभियान त्यांनी हाती घेतले. महाराष्ट्रात जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांच्या शेतीची नांगरणी, पेरणी, फवारणी, निंदन करुन शेतीमध्ये पिकवलेला माल थेट शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहचविण्याचे कामही त्यांनी केले. शेतकरी स्वावलंबी बनावा यासाठी धडपड करणारा असा नेता पुन्हा होणे नाही.
लेखक – श्री.सतिष एस राठोड (पत्रकार)
कल्याण, ठाणे
मो. 7977553903 , 8976293601