संत कबीराचा एक प्रसिध्द दोहा आहे. “जाति न पूछो साधु की ,पूछ लीजिए ज्ञान . मोल करो तरवार का पडा रहन दो म्यान . याचा अर्थ असा होतो की साधुसंताची ,सज्जनांची जात विचारात घेऊ नका.त्यांचे ज्ञान विचारात घ्या.म्यान महत्वाचे नाही ,तलवार महत्वाची आहे.संत ज्ञानदेव,संत तुकाराम ,संत नामदेव ,संत एकनाथ ,संत चोखा,संत सावता,संत सेना,संत गाडगेबाबा अशी अनेक संत महात्मे वेगवेगळ्या जातीत ,वेगवेगळ्या कालखंडात जन्माला आली पण सर्वांनी मानवतावादी कल्याणाची पताका उंच नेली.मानवतावादी कल्याणाची गुढी उंचच नेणा-या अशाच एका महान संताची आज जयंती आहे.त्या संताचे नाव आहे संत सेवालाल महाराज.
निसर्गपूजक ,कृषी संस्कृती रक्षक ,पशूपालक ,काटक अशा आदिम बंजारा समाजाचे अराध्य दैवत म्हणजे संत सेवालाल महाराज होय.त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 साली आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गोलालडोडी तांडा येथे झाला.वडील भीमानायक राठोड रामावत व माता धर्मणी या राजवंशीय जोडप्याचे ते जेष्ठ अपत्य.घरात कृषी सुबत्ता खूप होती.सेवाभाया व त्यांचे तीनही बंधू हापानायक ,बदूनायक,पुरानायक हे अतिशय शूर होते.
बंजारा समाज हा तांडा करुन राहतो.बदलत्या काळासोबत बंजारा समाजातही परिवर्तन झालं आहे.पण तरीही लोकजीवन ,संस्कृती ,बोलीभाषा ,पेहराव ,पारंपारिक नृत्य ,लोकगीते या बाबतीत हा समाज स्वतंञ ओळख कायम ठेऊन आहे.आज तांड्यावरील लोकजीवन स्थिर भासत असले तरी पोटासाठी हंगामी स्थलांतर चुकलेले नाही.पशूपालन व व्यापार हा बंजारा समाजाचा पारंपारिक व्यवसाय होता.त्यासाठी सतत भ्रमंती करावी लागत असे.मोगली आक्रमण व पुढे इंग्रजांच्या काळात पारंपारिक व्यवसाय बुडीत निघाले.त्यामुळे सामाजिक जनजीवनही विस्कळीत झाले.बंजारा समाजाला या बदलत्या परिस्थितीचा खूप मोठा फटका बसला.
गुजरात ,कर्नाटक ,महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश ,मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश ,पंजाब अशा प्रांतात हा समाज मोठ्या संख्येने विखुरला गेला.बडद बंजारा व लमाण बंजारा अशा दोन मुख्य उपशाखा असलेला समाज देशभरात काही उपजातींनीही ओळखला जातो.बडद म्हणजे बैल .बैल या पशूधनाशी संबंधित शाखा म्हणजे बडद बंजारा.मीठाचा व्यापार करणारी शाखा म्हणजे लमाण बंजारा.लवण या मीठाच्या समानार्थी शब्दावरुन लम्बाना ,लम्बानी व पुढे फक्त लमानी असा शब्द रुढ झाला.
संत सेवालाल महाराजांच्या जन्मावेळी हा समाज भारतभर विखुरलेला होता.शिक्षणाचा अभाव तर होताच शिवाय पोटापाण्यासाठी व्यवसायाचीही समस्या उभी राहिलेली होती.सेवालाल महाराजांनी जनजागृती केली.स्वतः तांड्या तांड्यावर फिरले.समाज व्यसनाधिनता ,गुन्हेगारी यांनी वेढला गेला होता.महाराजांनी बंजारा समाजाला ऐतिहासिक संस्कृतीची जाणीव करुन दिली.
लडी भजन ,सत्संग ,भजन यामधून लोकांना साध्या सरळ सोप्या भाषेत शिकवण दिली.थाळी नादावर आधारित भजन हा प्रकार आजही रुढ आहे.सेवालाल महाराजांची शिकवण आजही बंजारा समूहाला तोंडपाठ आहे.
सेवालाल महाराजांनी सांगितलेली सात महत्वाची तत्वे ही सकल मानव जातीच्या कल्याणासाठी आजही उपयोगी अशी आहेत.
1.सत्य….. सत्य जाणणे यातच जीवनाचे सार आहे.सत्य हेच जीवन आहे.महाराज सोप्या भाषेत सत्याचे महत्व सांगताना म्हणायचे की माणसाच्या आयुष्यात तीन आंघोळी फार महत्वाच्या आहेत.पहिली आंघोळ म्हणजे जन्म झाल्यानंतरची आंघोळ.ही आंघोळ तुमचं जीवन सुरु करते.दुसरी आंघोळ म्हणजे लग्नावेळेसची आंघोळ . ही आंघोळ तुमचं गृहस्थ आश्रमीचं जीवन सुरु करते.तिसरी अंघोळ म्हणजे अंत्यविधी पूर्वीची आंघोळ.ही आंघोळ आपलं शारीरिक कार्य संपल्याची खूण असते.प्रत्येक टप्प्यावरील जीवनकार्य महाराज समजून सांगत असत.
2. ब्रम्हचर्य .. सत्य जाणून घेण्याच्या पायरीवरील महत्वाचा टप्पा म्हणजे ब्रम्हचर्य .
3.अहिंसा..सेवालाल महाराजांनी अहिंसा तत्वाचा पुरस्कार केला होता.अहिंसा म्हणजे केवळ कोणाची हत्या करणे नव्हे तर काया ,वाचा मनाने कोणालाही न दुखविणे होय.सेवालाल महाराज स्वतः जगदंबा ,तुळजाभवानी ,शितला मातेचे भक्त होते.देवीचा कोप होऊ नये म्हणून बंजारा समाज पशूबळी देत असे.महाराजांनी या प्रथेला विरोध केला.देवी म्हणजे आई आहे.आई कधी लेकरांवर कोपत नसते असं त्यांनी सांगितलं.पशूबळी ऐवजी त्यांनी गहू -गूळ -तूप हा नैवेद्य सुरु केला.
महाराजांनी अहिंसेचा पुरस्कार केला असली तरी अन्यायाविरुद्ध लढण्याची हाक दिलेली होती.काठीला तलवार व दगडाला बॉम्ब समजावे.हीच आपली पारंपारिक हत्यारे आहेत.गुलाबखानासोबत झालेल्या लढाईत याच शस्ञाने त्यांच्या भावांनी युद्ध जिंकले होते.
4.सद्गुण धारण करणे ..मनुष्याचे खरे धन सद्गुण आहे.याशिवाय जीवन नाही.दुःखरुपी भवसागर तरुन जाण्यासाठी सद्गुण आपल्यात विकसित करणे आवश्यक आहे.
5.कोणालाही दंडित न करणे-– गोरगरीबांना वेगवेगळ्या कारणाने दंड आकारुन ,त्यांचे शोषण करुन स्वतःचे पोट भरणा-या लोकांना सेवालाल महाराज कडक शब्दात फटकारत असत.ते म्हणायचे
गोर गरीबेन डांडन खाये -सात पिढी नरकेमा जाये
ओरे वंशेपर कोनी रिये पायरीरो भाटा बनीयेर
म्हणजे दंडामुडपी करून खाणारांच्या सात पिढ्या नरकात जातील ,त्याचा वंश बुडेल व तो पायरीचा धोंडा बनेल.यावरुन महाराजांना शोषितांविरुद्ध किती तिटकारा होता याची जाणीव होते.
6.कपटनीतीचा त्याग करणे — छळ ,कपट ,बेईमानी करणारांची महाराज कान उघडणी करत असत.मानवतेला काळीमा फासणा-या गोष्टींपासून दूर राहा असं ते सांगायचे.
7. चोरी न करणे – बंजारा समाजात त्याकाळी चोरी करण्याचे प्रमाण खूप वाढले होते.महाराज म्हणायचे चोरी करणा-या थोड्या लोकांमुळे संपूर्ण समाजाची बदनामी होते.चोरी करणारांच्या हातात बेडी पडते.चोरी करून जगू नका.कष्टाची भाकरी खा.नीती नियमाने वागा.
समाजामधील वाईट प्रवृत्ती निघाव्यात म्हणून महाराज तांड्यातांड्यावर हिंडून प्रवचने देत असत.
*क्रांतीकारी संत*
—संत सेवालाल महाराज क्रांताकारी संत होते.*क्रांताकारी म्हटलं की लोकांना वाटतं ढाल तलवारी बंदुकीच असतील.महाराज शस्ञांच्या पठडीतील क्रांताकारी नव्हते,समाज सुधारणेतील क्रांतीकारक होते.त्या काळातील लोकजीवन व सेवालाल महाराजांचे कार्य यांचा तुलनात्मक अभ्यास केला की सेवालाल महाराजांची क्रांतीकारी विचारसरणी लक्षात येते.अक्षरशञू झालेल्या बंजारा समाजाला त्यांनी शिक्षणाचे महत्व सांगितले.
स्ञी शिक्षणाचा आग्रह धरला.पशुबळी प्रथा बंद केली. स्वतः श्रीमंत असूनही आपला पुतण्या जेतालालचा विवाह त्यांनी सामका नावाच्या अत्यंत गरीब घरातील मुलीसोबत लावून दिला.राजा बोले अन् दल हले असे एक मराठी म्हण प्रचलित आहे.बंजारा समाजातही नायक बोले तांडा चाले ही पद्धत होते.जात पंचायतीत नायक ,कारभारी यांच्याकडून अन्याय होत असे.नायक पद्धतीला त्यांनी विरोध केला.त्यागी ,दूरदर्शिता ,बुद्धीप्रामाण्यावर आधारित असे त्यांचे जीवनकार्य आहे.
सेवालाल महाराजांच्या काही प्रचलित टोपणनावावरुनही महाराजांची थोरवी आपल्या लक्षात येईल.
1.तोडावळो….महाराज आपल्या शिरी घुगू टोपावर तोडा वापरत असत.म्हणून त्यांना तोडावळो म्हणत.
2.मोतीवाळो..महाराजांच्या कार्याचा गुणगौरव म्हणून त्यांना मोत्याची माळ भेट दिलेली होती.बंजारा समाजाला या घटनेचा सार्थ अभिमान होता.म्हणून लोक त्यांना मोतीवाळो म्हणत.
3.गादीवाळो…सेवालाल महाराजांचे वडील भीमानायक राठोड हे 52 तांड्यांचे नायक व पाच हजारापेक्षा जास्त पशूधनाचे मालक होते.रामावत या राजघराण्याचे ते वंशज होते.सर्व समाजाला त्यांच्या राजगादी वारशाचा अभिमान होता.म्हणून समाज त्यांना गादीवाळो या नावानेही ओळखत असे.
4.पोरीया तारा...धृव तारा जसा अढळ व मार्गदर्शक आहे.तसं सेवालाल महाराजांचे स्थान आहे.गोर बंजारा समाजाचे ते मार्गदर्शक ,दिशादर्शक आहेत
या टोपणनावावरुन महाराजांची लोकप्रियता ध्यानी येते.
संत सेवालाल महाराज व आपला महाराष्ट्र
आपल्या महाराष्ट्रात बीड ,यवतमाळ ,नांदेड ,उस्मानाबाद ,परभणी ,हिंगोली जिल्ह्यात बंजारा समाज बहूसंख्येने आहे.सेवालाल महाराजांनी महाराष्ट्रात अनेक वर्षे घालविली आहेत.महाराजांना अत्यल्प आयुष्य लाभले.उणंपुरं पस्तीस वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं.त्यांना लंबी जिंदगी नाही लाभली पण त्यांनी जिंदगी माञ बडी करुन दाखविली.महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून त्यांनी परदेशी सत्ताधीशांशी व्यापार केला होता.धरमतर खाडीचे नाव त्यांच्या धर्मानायक या मिञावरुनच पडले आहे.गागोदे गावात सेवाभायाचे मंदीर आहे.जवाहरलाल नेहरू धक्का म्हणजेच सेवाभायाचा धक्का होता.
तीर्थक्षेञ पोहरादेवी..
यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवीला बंजारा समाजाचे तीर्थक्षेञ म्हटले जाते.*वर्षातून चार वेळा तेथे याञा भरते.रामनवमीला लाखोंच्या संख्येने बंजारा समाज पोहरादेवीला येतो.
संत सेवालाल महाराज बंजारा समाजाचे अराध्य दैवत असले तरी त्यांची शिकवण सर्वच जाती धर्मासाठी पोरीया तारा म्हणजे दीपस्तंभी मार्गदर्शकच आहे.
*अशा या महान संतास विनम्र अभिवादन.*
Tag Sant Sevalal Maharaj Jayanti