मुदखेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यासह राज्यात शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी गेल्या 3 वर्षापुर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात केंद्र शासनामार्फत मॉडेल स्कूल आदर्श विद्यालये कार्यान्वीत करण्यात आली होती, पण या शैक्षणिक वर्षापासुन केंद्रातील मोदी सरकारने निधीअभावी या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी व मुलींच्या शिक्षणाची मोठी गैरसोय होण्यास प्रारंभ झालाअसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शासनाने निधीची तरतूद करावी व या शाळा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे केंद्र व राज्य शासनाकडे जि.प.सदस्य रोहीदास जाधव यांनी केली आहे. 17 जून रोजी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदार्फत जी सर्वसाधारण सभा घेण्यात आली त्यामध्ये केंद्र शासनाच्या या शाळत्त बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध जिल्हा परिषद सदस्य रोहीदास जाधव यांनी नोंदवून जि.प.च्या ठरावाद्वारे या शाळा पुर्ववत सुरू करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील मुदखेड, उमरी, धर्माबाद व बिलोली या 4 तालुक्याच्या ठिकाणी या शाळा कार्यान्वीत करण्यात आल्या होत्या. पण या शैक्षणिक वर्षापासून सदर शाळा अचानक बंद झाल्यामुळे पालकांसह गरजू विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्याकाळात या शाळांना राज्यात गती मिळाली होती. तत्कालीन काँग्रेस शासनाने ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी घेतलेला निर्णय कौतूकास्पद असला तरी गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कल्याणाचा मार्ग बंद करण्याचा कुटील डाव भाजपाच्या मोदी सरकारने रचला असल्याचा घणाघाती आरोपही जिल्हा परिषद सदस्य रोहीदास जाधव यांनी केला असून सदर शाळा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांची भेट घेवुन पाठपुरावा करणार सल्याचेही जाधव यांनी या निमित्ताने पुढे बोलतांना स्पष्ट केले.