नळदुर्ग (शिवाजी नाईक) :- अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरीब बंजारा (लमाण) व दलित समाजाची घरे उध्दवस्त करणा-या संबंधित माथेफेरु अधिका-यांवर फौजदार गुन्हा दाखल करावे, त्याचबरोबर बेघर झालेल्या कुटूंबियांना येत्या महिन्याभरात पूर्वी राहत असलेल्या जागेवरच तात्काळ घरे बांधून व नागरी सुविधा पुरवून कायमस्वरुपी पुनर्वसन करावे, अन्यथा बंजारा क्रांती दलाच्यावतीने देशभर आंदोलन करण्याचा इशारा भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग भाई राठोड यांनी नळदुर्ग येथे दिले.
गेल्या महिन्यात नळदुर्ग येथे रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली गोरगरीबांची घरे प्रशासनाने नोटीस न देता बेकायदेशीररित्या उध्दवस्त झाल्याची माहिती मिळताच मुंबईहून भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग भाई राठोड यांच्यासमवेत राज्यातील पदाधिका-यांनी रविवार दि. 24 जानेवारी रोजी नळदुर्गला भेट देवून लमाण कुटूंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन दिलासा दिला. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची भेट घेवून तात्काळ उघडयावर असलेल्या बेघर कुटूंबियांचे पूर्वी राहत असलेल्या जागेवरच पुनर्वसन करण्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगून तात्काळ मुलभूत सुविधा पुरविणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी प्राथमिक स्वरुपाची मदत म्हणून रोख रक्कम बेघर कुटूंबियांना दिली.
यावेळी राठोड म्हणाले की, पन्नास वर्षापासून वास्तव्य करीत असलेल्या बंजारा समाजाची घरे नगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने नेस्तनाबूत केल्याने तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गचा बंजारा समाजाला आज उघडयावर वास्तव्य करण्याची वेळ आली आहे. 2022 पर्यंत सर्वांना घरे या योजने अंतर्गत दारिद्रयरेषेखालील कुटूंबियांना मोफत घर जागा देण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या योजनेला मुख्याधिका-याने हालताळच फासला आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे काढीत असताना नळदुर्ग येथे बंजारा, दलित व इतर समाजाची शेकडो घरे पालिकेच्या अतिक्रमण पथकाने विनासूचना देता जमीनदोस्त केली.
या सर्व प्रकरणाची दखल घेत भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड यानी उध्दवस्त बंजारा कुटूंबियांची भेट घेवून तातडीने पुनर्वसन करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याकडे मागणी लावून धरणार असल्याचे सांगितले. पुनर्वसन न झाल्यास तीव्र अशा पध्दतीचे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी बंजारा क्रांती दलाचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब राठोड, महाराष्ट्र संघटक सज्जन राठोड, कर्नाटक संपर्कप्रमुख राजू राठोड, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पिंटू राठोड, उमरगा तालुकाध्यक्ष अविनाश राठोड, उपतालुकाध्यक्ष किरण चव्हाण, तुळजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, विकास जाधव, सुदर्शन राठोड, अविनाश राठोड, सुधीर राठोड, शंकर पवार, बालेश्वर नाईक, नगरसेवक संजय बताले, भाजपाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे, नळदुर्ग शहराध्यक्ष पदमाकर घोडके, सुशांत भूमकर, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, पत्रकार शिवाजी नाईक, भिमा राठोड, जिजाबाई नाईक, राजाराम नाईक, वालाबाई जाधव, अशोक बंजारे, संजिवनी पवार, विकास नाईक, अरुण नाईक, सतीश राठोड, बाशेमियाँ कुरेशी, निजाम बागवान आदीजण उपस्थित होते.