बंजारा समाजाची काशी (पोहरादेवी)

Poharadevi Temple -entry-gate

बंजारा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला एक वेळ पोहरादेवी येथे जावून संत सेवालाल महाराज, माता जगदंबा याडी, सामकी याडी चे दर्शन घ्यावे ही मनापासून ईच्छा असते. मी पोलीस खात्यात असतांना माझी बदली सन 2005 मध्ये वाशिम येथे झाली. रामनवमीला पोहरादेवी येथे बंजारा समाजाची फार मोठी यात्रा भरते. त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागतो. माझी पोहरादेवीला जाण्याची लहानपणापासूनच ईच्छा होती. नोकरी असल्याने जाता आले नाही, आता जवळ बदली झाल्याने डय़ुटी लावून जावे असे ठरवून मी एस.पी.साहेबांना विनंती करून पोहरादेवी यात्रेला डय़ुटी लावून घेतली.

Poharadevi Temple -entry-gateपोहरादेवी यात्रे ध्ये मानोरा पोलीस स्टेशनमधून बंदोबस्त लागतो. बरेच पोलीस कर्मचारी यात्रेत बंदोबस्तासाठी लागले होते. पोलीसांना राहण्या करिता संत सेवालाल महाराजांच्या मंदिरासमोर बांधलेला एक हॉल देण्यात आला होता. तेथे फक्त हॉल होता बाकी शौचास जाण्यास शौचालय नव्हते, पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, जेवणाची व्यवस्था नव्हती, म्हणजे

एकंदरीत हालचं होते. माझी जगदंबा मंदिरासमोर डय़ुटी लागली होती. सर्वात महत्वाचा पाईंट होता या ठिकाणी रामनवमीला मंदिरासमोर बोकुड बळी देण्यास कोर्टाने मनाई केली आहे. तसा बोर्ड मंदिरासमोर लावण्यात आला होता. माझ्यासोबत बंजारा समाजाचे 15 ते 20 पोलीस कर्मचारी बंदोबस्तात होते. मंदिरासमोर मैदानात बाजूला राहूटी लावण्यात आली होती. मंदिरासमोर झेंडय़ाजवळ मोकळ्या जागेत बोकडाची पुजा करून तेथे बळी देण्यात येते ते आम्हाला थांबविणे होते. ते एकदम कठीणच होते. आम्ही एक दिवस आधीच यात्रेत पोहचलो. यात्रा भरली होती. मंदिरापर्यंत वाहने आली होती. रात्री मंदिरासमोरच राहूटीत मुक्काम केला. रामनवमीचा दिवस उजाडला. आम्ही सकाळीच उठून शेजारच्या खारीत (शेतात) शौचास जावून आलो. मित्राच्या घरी आंघोळपाणी केले व सकाळीच सहा वाजता मंदिरासमोर आलो. तर झेंडय़ाजवळ रक्त सांडलेले दिसले. “अरे बापरे गेली नोकरी” मी मनात पुटपुटलो. सकाळीच पोलीस नसल्याचे पाहून कुण्यातरी भक्तांनी बोकडाची पुजा करून तेथेच बळी दिला होता. मी शिपायाला त्या रक्तावर माती टाकण्यास लावले व मंदिरासमोर मैदानात पुजेच्या जागेभोवती सर्व पोलीस लावून दिले. बंजारा भक्त बोकूड घेवुन येवू लागले. एका एका बोकडा सोबत 15 ते 20 लोक हातात सुरी, भगोने वगैरे साहित्य आणि खाटीक सोबतच घेवून आले. मी त्या लोकांना जवळ जावून त्यांना बंजारी भाषेत समजावले. “बापू आतं बोकडय़ा काटतूं आयेनी कोर्टे रो आदेश छ (त्यांना बोर्डाकडे बोट दाखवून) तम आतं बोकडय़ारं देवी मुडांग पुजा करो, बोकडय़ा धडधडी लेलदो की वोनं वटानं दुसरे वडी लेजानं काटो आत मत काटो” असे त्यांना समजावित होतो. गोरमाटी भक्त साहेब सांगत आहे म्हणून ऐकत होते. ते धडधडी घेवून बोकड दुसरीकडे नेवून कापत होते. प्रत्येकांना आम्ही हेच समजावून सांगत होतो. थोडय़ा वेळाने मंदिरासमोर गोरमाटी भक्त बोकडय़ा घेवून, हातात सुर्या घेवून पुजा करण्यास उभे असता तेथे अचानक एस.डी.पी.ओ.साहेब पोलीस स्टॉफसह आले आणि मंदिरासमोर बोकुड व लोकांना पाहून

लोकांच्या हातातील सुरे, भांडे पाहून हे लोक येथे बोकुड कापत आहे असे त्यांना वाटले. म्हणून ते एकदम माझेजवळ येवून एकदम ओरडले, “राठोड दिखता नहीं क्या ? क्या कर रहा है तु ? यहॉ पर बोकूड लेकर लोक कैसे खडे है” मी त्यांना शांत स्वरात म्हटले, “सर आम्ही लोकांना मंदिरासमोर बोकुड घेवून पुजा करण्यास रोखू शकत नाही, बोकुड बळी देण्यास कोर्टाने बंदी आणली आहे. बोकुड घेवून पुजा करण्यास मनाई नाही, ते पुजा करू शकतात. त्यांना तुम्ही अडवू शकत नाही, ते लोक फक्त मंदिरासमोर बोकुड देवीसमोर उभे करून देवीला, “हे माते तुझे कबुल केलेले नवस कबुल कर” असे भोळ्याबापडय़ा भाषेत देवला प्रार्थना करीत आहे. बस बोकडय़ाने धडधडी घेतली की ते बोकूड उचलून दुसरीकडे नेवून कापणार.” साहेबांना मी समजावून सांगितले की, जर असे केले नाही तर लाखो लोकांचा जमाव यात्रेत आहे आपण काहीही करू शकणार नाही. ते लोक श्रध्देने मंदिरासमोर फक्त बोकडाची पुजा करीत आहेत. येथे कापत नाही त्यांना पुजा करू द्यायला काही हरकत नाही हे साहेबांना समजले व ते शांत झाले. ते राहूटीजवळ खुर्ची टाकून बसले. मला म्हणाले की, राठोड ये धडधडी क्या होती है ? तेव्हा मी त्यांना सांगितले की, गोरमाटी लोक देवीला बोकडाचा नवस कबुल करतात, बोकूड मंदिरासमोर आणतात, बोकडय़ाच्या कपाळाला गंध कुंकू लावून पुजा करतात, लोटय़ामधील पाण्याने बोकडय़ाचे पाय धूतात व दोन-तीन पाण्याचे थेंब बोकडय़ाचे कानात टाकतात. मग ते बोकडाचे मागे देवीसमारे हात जोडून उभे राहतात व हे देवी माते तुझ्यासाठी कबुल केलेला नवस कबुल कर. मग बोकूड थोडा समोर जावून आपले अंग झटकतो त्याला धडधडी घेणे म्हणतात. तेव्हा देवीने आपला नवस कबूल केला असे समजून मग हे भाविक बोकुड कापतात व त्याचे मटन शिजवून नारेजा, कलेजीचा प्रसाद भाकरीवर देवीसमोर ठेवतात व बाकी मटन सोबत आलेल्या आप्ता सोबत खावून आपला नवस पूर्ण झाल्याच्या समाधानाने गावी परत जातात. साहेब थोडा वेळ थांबले व यात्रेत निघून गेले. मी देवीच्या मंदिरासमोर सतत 4 वर्षे डय़ुटी केली. मंदिरासमोर बोकूड पुजेच्या वेळी बोकडाचे कानात, अंगावर पाणी टाकतात म्हणून बोकूड धडधडी घेतो असा समज लोकांन

निर्माण केला आहे. मी मंदिरासमोर दिवसरात्र थांबून हा प्रकार अगदी जवळून बघितला आहे. एका सोईने 10-10, 20-20 बोकडांना सोबत धडधडी घेताना पाहिले आहे. अंगावर, कानात पाणी टाकल्यानेच बोकूड धडधडी घेतात असे नाही काहींच्या अंगावर गुंडभर पाणी टाकून सुध्दा दोन ते तीन तास पर्यंत बोकूड नुसता उभा राहतो. भक्त लोक हात जोडून उभे राहून थकून जातात. आई रागाविली तर नाही ना ! मोठी बूढी घरी राहिली पूढच्या वर्षी आणीन वो माय असे म्हणून घरचे सारे सदस्य त्या बोकडाची पूजा करतात. बोकूड नुसता उभा राहतो धडधडी घेतच नाही. मग कंटाळून त्याला मंदिरात सोडून देतात व वेळेवर दुसरा बोकूड आणून पुजा करतात. बोकडय़ाच्या अंगावर, कानात पाणी टाकल्याने बोकूड धडधडी देतो हा चुकीचा समज आहे. काही बोकूड तर नुसते कपाळावर हळद, कुंकू लावून सोडले तरी लगेच धडधडी घेतांना मी समोर पाहिले आहे. काहीतर नुसते उभे करून दिले की, “ल याडी” म्हणताच बोकूड धडधडी देतांना मी पाहिले आहे. तर असो रामनवमीच्या दिवशी फक्त बोकडाची पुजा करतात. थोडय़ा वेळाने ज्वारीच्या दोन भाकरीवर कलेजी, नारेजाचा प्रसाद झेंडय़ासमोर खाली ठेवतात तेथील काही स्वयंसेवकलगेच तो प्रसाद उचलून घेतात आणि त्या प्रसादासाठी अक्षरशः भांडणे करतात. भक्तांना पुजा सुध्दा करू देत नाही हे दृश्य फार वाईट दिसते. मंदिरात लोक नारळ फोडतात, नारळ एका जागेवर फोडत नाही, मंदिराच्या फरशीवर नारळ आपटतात. काही जागा मिळत नाही म्हणून मंदिराच्या खांबावर नारळ आपटतात. काही महाभाग तर छताला नारळ मारून फोडतांना मी पाहिले आहे. मंदिरात एवढी गर्दी होते की,रेटारेटी होते त्या गर्दीमध्ये खिसेकापू हात साफ करतात. जगदंबा मंदिरापासून सेवालाल महाराज मंदिरापर्यंत त्या रस्त्यावर नारळाच्या सालटय़ाचा थर साचतो. कुणी ते उचलत नाही. आता काहीं संस्थेचे स्वयंसेवक हे उचलून साफ करतांना दिसतात. यात्रेत रस्त्यावर जिकडेतिकडे चहा, भजे, पाणी कटलरी यांची दुकाने असतात. त्यामुळे धड चालता येत नाही. काही महाभाग तर अशाही गर्दीमध्ये दुचाकीचे हॉर्न वाजवित वाहन नेतांना व कसरत करतांनादिसतात. यात्रेध्ये लोकांना पिण्यास पाणी नसते, पाणी पाउच विकणारे अव्वाच्या सव्वा किंमतीत पाउच विकतांना दिसतात. मंदिरात, परिसरात पाय ठेवायला जागा नसते. मंदिराबाहेर शेतात सुध्दा लोकांची गर्दी असते. नवस पुजेवाले शेतात विहीजवळ बोकूड शिजवितांना व रस्त्यावरच पंक्तीमध्ये जेवण करतांना दिसतात. मंदिरात बंजारा त्रिया आपआपल्या पारंपारिक बंजारा पोहरावात येतात. त्यांचा पेहराव आपआपल्या प्रातांची झलक दाखवून देतो. आंध्र, कर्नाटक, जळगाव- खान्देश, वर्हाडी, मध्यप्रदेश, राजस्थान अशा वेगवेगळ्या प्रांतांच्या त्रिया आपआपल्या प्रांतानुसार बंजारा पोहराव केलेल्या दिसतात. मी प्रत्येक प्रातांच्या गोरमाटी बंधुसोबत गोरमाटी भाषेत बोललो. “तु च्या कडे कशी पध्दत” एक जोडपे तर काश्मिरमधून आले होते. भाषा थोडी वेगळीच परंतु टोनिंगवरून बंजारी भाषाच आहे असे समजून येते. एका वर्षी तर बांगलादेशातील बंजारा मला भेटले. दोन तीन तर ‘रा बंजारा’ ‘जिप्सी’ आले होते. रशियामध्ये रा बंजारा खुप प्रमाणात आहे. जर्मनी, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया अशा युरोप देशात बंजारा आहे. ते तेथील भाषेसोबत मुळ बंजारा भाषा बोलतात व आपला पारंपारिक पोषाख घालतात. सन 2000 मध्ये युरोपमध्ये बंजारा समाजातील मृत व्यक्तीला अग्नी देण्याची प्रथा माहित नव्हती तेव्हा तेथील रा तांडा मुखिया याने भारतात येवून ऑल इंडिया बंजारा संघाचे तत्कालीन अध्यक्ष मा.रणजीत नाईक यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली होती व त्यांनी बंजारा समाजाचे धर्मगुरू (महाराज) यांना युरोपमधील नॉर्वे येथे धार्मिक परंपरा सांगण्यास पाठविले होते. तर असा हा आमचा बंजारा समाज सार्या जगात

विखुरलेला आहे. यात्रेबद्दल सांगितल्यास यात्रे ध्ये वाहनाची एवढी गर्दी होते की, पोहरोदवीला चोहोकडून येणारे रस्ते वाहनाने भरून जातात. वाहनाची सतत रांग असते यामुळे लोकांना यात्रेत पाय ठेवता येत नाही. हजारो वाहने शेतात उभी असतात. यात्रा परत होत असतांना आम्ही पुसद येथे शिवाजी चौकात वाहने मोजली होती. तर एका तासाला 200 वाहने रोडवून दिवसभर जात होती. यावरून किती वाहने या यात्रेत येतात याचा अंदाज लागू शकतो. रामनवमीला पोहरोदेवी येथे 5 ते 6 लाख लोक जमा होतात. एकाच समाजातील एवढय़ा संख्येने लोक एखाद्या तीर्थस्थळावर जमा होतात. मुस्लीम बांधवांच्या काबा नंतर पोहरोदेवी येथेच जमा होतात असे सांगितल्यास वावगे ठरू नये. एवढे भक्त या तिर्थक्षेत्रावर जमा होत असतांना त्या लोकांच्या सोईकरिता व्यवस्था नावाच्या शब्दाचा उपयोगच होत नाही. नुसते हालअपेष्टा होतात. पोहरादेवी यात्रेमध्ये यात्रेकरूंच्या सोयीसाठी तीर्थक्षेत्र म्हणून खालील सोयीकडे लक्ष देणे समाजाचे, प्रशासनाचे गरजेचे बनलेले आहे. यात्रेकरूंना राहण्यासाठी भक्तनिवास नाही. जे आहेत ते कुचकामी आहेत, शौचालय नाही, सर्वत्र घाण पसरते त्यामुळे भयंकर रोगराई येण्याची दाट शक्यता आहे, पिण्याच्या पाण्यासाठी काहीच सोय नसते. जी असते ती फार थोडकी असते, यात्रेकरूंना वाहने पार्कींग करिता व्यवस्था नाही. त्यामुळे पुर्ण रोडवर ट्रॉफिक जाम होते. लोकांना चालता पण येत नाही, रस्ते बरोबर नाहीत. पोहरादेवीकडे चोहोकडून येणारे रस्ते सिंगल असून कच्चे, फुटलेले, खड्डे पडलेले आहेत. चौसाळा फाटा ते पोहरादेवी हा रस्ता कच्चा व नॅरोगेज सारखा आहे आणि त्यावर दोन नाले येतात. त्यामध्ये टोंगळाभर पाणी असते व त्यामधून कसेबसे यात्रेकरू आपली वाहने काढतांना दिसतात. पोहरादेवीला बंजारा समाजाची काशी म्हणतात. मागचे जावू द्या होत आता 50-60 वर्षापासून या भागातील नेत्यांना साधे रोड दुरूस्त करता येत नाही. यात्रेकरूसाठी कोणतीच व्यवस्था करता येत नाही. मंदिराजवळचे सेवालाल महाराजाचे वंशज आहे म्हणून ते लोक विकास करू देत नाही. ते जावू द्या बाहेरचे बघा ना. रस्त्यावर चौकाचौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, रस्ते ही कामे जिल्हा परिषद मधून केल्या जावू शकते. बाकीच्या तिर्थक्षेत्राचे उदाहरण घ्या. मंदिर परिसर सुशोभित, स्वच्छ, प्रत्येक चौकात शौचालय, मुत्रीघर, पाण्याची टाकी, भक्तनिवास सुसज्ज, चौपदरी रस्ते बॅरीकेटस लावून सुरक्षा यंत्रणेसह दिसून येईल. पोहरादेवी यात्रेत मात्र लाखो

भाविक सर्वच सोयीपासुन वंचित राहतात. बिच्चारे आपल्या सोयीने येतात म्हणून ठीक व संत सेवालाल महाराज यावर अथांग निष्ठा, श्रध्दा ठेवून येतात म्हणूनच की काय दरवर्षी लाखोंची भिड असते. वाहनांची सतत रांग असते. मात्र एखादा मोठा अपघात, दुर्घटना, महामारी यामुळे यात्रेत लोक दगावले असे आजही येथे ऐकीव नाही. मागे केदारनाथ येथे हजारो लोक मरण पावले होते. पोहरादेवी येथे तर असे काहीच घडत नाही ही बंजारा समाजाच्या भक्तांची संत सेवालाल महाराज यांच्यावर असलेल्या अथांग निष्ठेwळेच आहे. असे भक्त यापुढेही येथे सतत येत राहतील यात शंका नाही.

“सर झुकाओंगे तो पत्थर देवता हो जायेगा इतना मत चाहो उसे वो बेवफा हो जायेगा दुआँ बहार की माँगे तो इतने फुल खिले की कहीं जगह ना मिली मेरे आशियाने को”

-नामदेव राठोड,पुसद, मो.

9689881488.

Tag : Poharadevi Temple, Sevalal Maharaj Temple Mahrashtra, Banjara Kashi kshetra