बंजारा समाजातील होलिकोत्सव (Banjara Holi, lengi Festival)

holi-gor-banjara

Banjara Holi diwali

प्राचीन काळापासून दर्‍याखोर्‍यात वावरणार्‍या बंजारा समाजाचा इतिहास बंजारा लोकसंस्कृतीमधून दिसून येतो. बंजारा समाजाचा होळी उत्सव म्हणजे ग्राम रंगभूमीवरील टोटल थिअटरचा अविश्कार म्हणावा लागेल. हा होलीकोत्सव म्हणजे विधी नाट्य सोहळाच असतो. ज्याप्रमाणे रामपुरच्या रामलीलेमध्ये वेगवेगळी दृश्य वेगवेगळया ठिकाणी सादर होतात. त्याचप्रमाणे बजारा समाजातील होलिकोत्सवातील विधी व नृत्य गावातील वेगवेगळया ठिकाणी तीन दिवसपर्यंत संपन्न होत असतात.

सर्व विधी एका सुत्रामध्ये बांधलेले असतात. प्रत्येक समाजातील लोकसंस्कृतीत, सण आणि उत्सवांमध्ये विशेषता असतात त्याप्रमाणे बंजारा लोकसंस्कृतीमध्येही होळी उत्सवाचे विशेष महत्व दिसून येते. प्राचीन काळापासून वर्‍हाड प्रांतातील बंजारा समाजाचा ‘होळीच्या उत्सवात, बंजारा समाजाच्या प्रथा, रूढी आणि परंपरा संस्कृतीचे दर्शन घडते.

अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्यांमध्ये बंजारा समाज विखुरलेला आहे. वर्‍हाडातील या पाचही जिल्हयातील बंजारा समाजातील होलीकोत्सव अतिशय आगळया- वेगळया स्वरुपात फाल्गूनात सपन्न होतो.

यवतमाळ जिल्यातील ग्रामपंचायत फुलउमरी या गावी होळी हा सण मोठया उत्साहाने साजरा करतात. सर्व ग्रामजण या उत्सवात सामील झालेले असतात. होळी हा सण बंजारा समाजासाठी महत्वाचा सण आहे. होळीमध्ये लेंगी गीत गायल्या जाते. लेगी

गीतांमध्ये होळीचे वर्णन केलेले असते. या लेंगी गीतांवर स्त्री-पुरुष गोलाकार वर्तुळात नाचत असतात. लहान मुलांपासून तर वृध्दमाणसांबरोबर या उत्सवात लेंगी गीत गात-गात नृत्यही सादर करतात. तीन दिवस हा उत्सव गावातील तांडयावर चाललेला असतो. प्रत्येक तांडयावर होळीचे रंग उधळले जातात. इतर समाजामध्ये होळी ही आधल्या दिवषी सायंकाळी पेटते परंतू बंजारा समाजामध्ये दुसर्‍या दिवशी सकाळी म्हणजे धुलीवदनाच्या दिवशी होळी पेटवली जाते. गावकर्‍याच्या सामुहिक उत्सवामुळे बंजारा समाजात एकात्मता निर्माण झाल्याचे दर्शन घडते. समाजाची प्रगती साधण्यासाठी व बंजारा समाजाच्या लोककला रूढी आणि परंपरा प्रवाहीत राहण्यासाठी होळी हा उत्सव, बंजारा समाज जीवनाचे अंग ठरला आहे असे म्हणता येईल.

परंपरेने चालत आलेली मौखिक गाणी, डफावर चाललेला लोकसमूहाचा नृत्यमय आविष्कार, पारंपरिक वेशभूषा, केशभूषा बंजारा समाजातील आगळेवेगळे आकर्षण ठरत.

बंजारा समाजातील लोकसंस्कृतीच्या प्रवाहांतर्गत रितीरिवाज, सण, उत्सव, व्रत, खेळ आणि मनोरंजन यांचा समावेष होतो. बंजारा समाजाची लोकगीतं, जन्म, विवाह आणि मृत्यू या संबधी असतात. व्रत व उत्सवातील लोकगीतं हे तीज उत्सव, जन्माश्टमी, होळी, क्रिया गीत, कृशीसंबधी गीते, घटीर गीते, लोरी गीते, पारिवारीक संबंधातील देवर-भाभी, सास-बहु, उपदेष गीत आणि मुलींची खेळ गीते इत्यादी प्रकारची असतात. लडी नृत्य, उपरेरो नृत्य, डोडो नगारा नृत्य, पीर नृत्य, राधा नृत्य, लंगडी पाय नृत्य, कुमारी कन्या नृत्य, दांडा जोडी नृत्य, टिपरी नृत्य, तीज नृत्य इत्यादी नृत्यप्रकार बंजारा समाज सादर करतात. बंजारांच्या लोककथा व अध्यात्मिक कथामध्ये सतीसावित्री, नीती, धर्मेरोफल, गुरूरी आज्ञारा फल, चतुरकुकडो, चतुरसाकिया, अवतारी बलष अषा असतात. समाजाच्या अध्यात्मिक कथेअंतर्गत संत सेवालाल महाराज यांचा जन्म, मृत्यू, व त्यांचे सामाजिक व आध्यात्मिक कार्य यांचा समावेष होतो.

Tag: Banjara Festival, Banjar Holi Utsav, Banjara Lengi Mahotsav