अनुवादाची आनंदशाळा : कमळेवाडी आश्रमशाळेतील मुलांचा प्रयोग
जाणते समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची सहचारिणी बनत क्रांतीची मुळाक्षरे गिरवणार्या सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेली ‘काव्यफुले’ विविध बोलींमधून अनुवादित झाली आहेत. कमळेवाडी तांड्यावरच्या आश्रमशाळेतील शाळकरी मुलांनी ‘अनुवादाची आनंदशाळा’ या प्रयोगातून हा साहित्यखजिना समोर आणला आहे.
लेखणीचा वापर समाजप्रबोधनासाठी करत सावित्रीबाई फुले यांनी सहजसोप्या भाषेत कविता रचल्या. या कवितांचे ‘काव्यफुले’ व ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ असे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. अभंग, अनुष्टुभ वृत्तासह मुक्तछंदातही त्यांनी रचना केल्या. त्यापैकी १८५४ साली आलेल्या ‘काव्यफुले’ मधील निवडक रचना मुखेडजवळील कमळेवाडीच्या ‘विद्यानिकेतन पब्लिक स्कूल’ या भटक्या-विमुक्तांच्या आश्रमशाळेतील मुला-मुलींनी आपल्या बोलीभाषांमध्ये आणल्या.
गोरमाटी, वडारी, पारधी, दख्खनी परदेशी व अहिराणी या बोलीभाषांमधील या रचना ऐकायला अतिशय गोड वाटतात. यात पूजा भोसले, आरती वाघमारे, शाहीन भांडे, अमोल राठोड, नागेश पवार, सचिन मासुळे, अर्चना गायकवाड, दरर्शना रठोड,प्रवीण जाधव,विशाल शल्हाळे, पायल चव्हाण या मुलांनी कविता अनुवादित केल्या आहेत. या शाळेतील मराठीचे प्रयोगशील शिक्षक शिवाजी आंबुलगेकर ‘अनुवादाची आनंदशाळा’ हा स्वतंत्र उपक्रम यासाठी चालवतात.
याबाबत आंबुलगेकर म्हणाले, ‘मी ज्या शाळेत शिकवतो तेथील मुले बहुतेक आदिवासी, भटकी विमुक्त आहेत. क्रमिक पाठय़पुस्तकांमधील प्रमाण मराठी त्यांच्यासाठी अपरिचित असते. अनेक सुंदर कविता, कथांचे अर्थ त्यांच्यापर्यंत पोचण्यात अडथळे येतात. हा अनुभव आल्यावर शब्दांचे अर्थ त्यांच्या बोलीभाषेत देणे मी सुरू केले.
या बोलींचे शब्दकोश विकसित करण्याचे कामही आम्ही हाते घेतले आहे. यापुढचा प्रयोग म्हणून अध्यापनामध्ये अनुवाद ही स्वतंत्र पद्धती विकसित केली. कवितांच्या अध्यापनात हा प्रयोग खूप यशस्वी ठरला. पाठय़पुस्तकातील बालकवी, बहिणाबाई चौधरी, शांता शेळके, साने गुरुजी यांच्या कविता व गाणी मुलांनी आपल्या मातृभाषेत अनुवादित केली. या आशयघन रचना त्यांच्यापर्यंत नेमकेपणाने पोचल्या.
आता ही मुले केवळ परिक्षांपुरती वह्या-पुस्तकात न रमता नव्या निर्मितीचा आनंद घेतात. सावित्रीबाईंच्या या कवितांचा अनुवाद येत्या काळात पुस्तकरूपात आणण्याचाही मानस आहे.’ बोलीचे बोलू कौतुके!
इयत्ता आठवीत शिकणार्या सुवर्णा राठोडची मातृभाषा गोरमाटी आहे. या प्रयोगाविषयी ती म्हणते, बाहेरच्या जगात इंग्रजीला खूप महत्त्व आहे. पण आमची गोरमाटी भाषा मला खूप आवडते. या भाषेतली गाणी, म्हणी अशा अनेक गोष्टी सुंदर आहेत. अनुवादातून गोरमाटी बोलीला जपण्यासाठी काही करता येते याचा आनंद होतो. सावित्रीबाई फुले
जयंती विशेष
Thanks & Regards,
Akshay Ravindra Pawar
9833662729