मुंबई येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार

(श्री. सतिष एस राठोड) ✍

नवी दिल्ली :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी २०१९ रोजी मुंबई येथील फिल्म डिव्हिजन परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे.

संग्रहालय सल्लागार समितीचे अध्यक्ष, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली फिल्म डिव्हिजनच्या परिसरात दोन इमारतींमध्ये हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.

संग्रहालय उभारणीसाठी १४० कोटी ६१ लाखांचा खर्च आला असून व्हिज्युअल्स, ग्राफिक्स, मल्टीमीडिया व इंटरॅक्टिव्ह एक्सिबीट्स आदींचा समावेश असलेल्या या संग्रहालयाच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरवशाली प्रवास मांडण्यात आला आहे.

संग्रहालय दोन इमारतींमध्ये उभारण्यात आले असून नवीन संग्रहालय इमारत व एकोणीसाव्या शतकातील ऐतिहासिक गुल्शन महल येथे आहे. नवीन संग्रहालयात ‘गांधी आणि चित्रपट’, ‘मुलांचा चित्रपट स्टुडियो’, ‘तंत्रज्ञान, सर्जनशीलता व भारतीय चित्रपट’ आणि ‘भारतातील चित्रपट’ अशी दालने आहेत.
गुल्शन महल ही भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वारसा इमारत असून ती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचाच भाग आहे. याठिकाणी ९ दालने असून याद्वारे भारतीय चित्रपटाचा शंभर वर्षांचा प्रवास दर्शविण्यात आला आहे.