मुखेड (प्रतिनिधी) – तालुक्यातील निकषपात्र 10 तांडय़ांना राज्य शासाने महसूली दर्जा दिला असून आ.डॉ.तुषार राठोड यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुखेड तालुक्यातील असंख्य वाडी-तांडे असून शासन निकषपात्र 10 तांडय़ांना महसूली गावांचा दर्जा द्यावा, अशी मागणी व रितसर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. सदर प्रस्ताव शासनाकडे गेल्या वर्षभरापासून पडून होता. राज्यात सत्ताबदल झाला आणि मुखेडचे नुतन आमदार डॉ.तुषार राठोड यांनी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे या विषयी सतत पाठपुरावा केल्याने तालुक्यातील हिरामन तांडा, मन्नू तांडा, सखाराम तांडा, खोबा तांडा, काळू तांडा, सन्मुखवाडी, वसूर तांडा, चिंचनापल्ली तांडा, लोभा तांडा, लखू तांडा या 10 तांडय़ांना महसूली दर्जा मिळाला आहे. सदर निकषपात्र तांडय़ांना महसूली दर्जा देवून स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यान्वित करावी, यासाठी बंजारा समाजाचे धडाडीचे नेते एम.डी. उर्फ माधव राठोड, अशोक चव्हाण, सुनिल राठोड, गणपत चव्हाण, शिवाजी राठोड, प्रा.डी.बी.चव्हाण, राम राठोड आदिंनी विशेष प्रयत्न केले होते. त्याच बरोबर तत्कालीन प्रभारी तहसीलदार विजय चव्हाण यांनी शासनाकडे विहीत नमुन्यातील रितसर प्रस्ताव सादर केला होता. सदर तांडय़ांना महसूली दर्जा दिल्याबद्दल माजी आ.किशनराव राठोड आ.डॉ.तुषार राठोड, जिल्हा बँकेचे संचालक गंगाधरराव राठोड, भगवान दादा राठोड, माधवराव राठोड आदिंनी राज्य शासनाचे आभार मानले आहे.
मुखेड तालुक्यातील 10 तांडय़ांना मिळाला महसूली गावांचा दर्जा
