पाथर्डी (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचे पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार यांनी भाजपाला सोडचिठी देत उध्दव ठाकरे व आमदार डॉ.निलम गोर्हे यांच्या उपस्थितीत मातोश्री वर शनिवारी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. पवार हे ऍड.प्रताप ढाकणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मूळचे सेनेचे असलेले पवार यांनी ऍड.ढाकणे यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पूर्वी झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत ते माणिकदौंडी गणातून भाजपकडून निवडून आले होते तर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतही ते संचालक म्हणून निवडून आले होते. लोकसभानिवडणूक काळात ऍड.ढाकणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पवार हे राष्ट्रवादीत गेले नाहीत; मात्र, ढाकणे गटाची साथ त्यांनी सोडली नाही. नुकत्याच झालेल्या पंचायत समती सभापती उपसभापती निवडणुकीच्या वेळी आपल्याला सभापती करावे, अशी पवार यांची मागणी होती; मात्र, या पदावर ढाकणे यांनी राजळे गटाच्या सदस्या उषा अकोलकर त्यांना सभापती केल्याने पवार नाराज झाले होते. या नाराजीतून त्यांना आमदार निलम गोर्हे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांचा शिवसेना प्रवेश निश्चित करण्यात आला. मनसेचे विभागप्रमुख कलीम बागवान, माजी उपनगराध्यक्ष इसाक सय्यद तसेच इतर तीस कार्यकर्त्यांसह त्यांनी उध्दव ठाकरे, निलम गोर्हे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी शिवसेनेचे तालुका उपप्र wख राम लाड, शहर प्रमुख भाऊसाहेब धस, विभागप्रमुख भगवान दराडे, संतोष मेघुंडे आदि उपस्थित होते.