वाशिम : राज्यात भटक्या विमुक्तांची लोकसंख्या २.५0 कोटीच्या जवळपास आहे. सरकार भटक्या आणि विमुक्तांच्या कल्याणकारी योजना बंद करण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आ. हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे. यासंदर्भात शासनाच्या विरोधात मुंबई येथे २३ फेब्रुवारी २0१६ रोजी मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हय़ात १५ फेब्रुवारी नांदेड, १८ फेब्रुवारी वाशिम, २२ फेब्रुवारी लातूर, ५ मार्च बीड, १९ मार्च हिंगोली, २0 मार्च इंदापूर, २२ मार्च कन्नड महाराष्ट्रभर या पंधरवड्यात आंदोलने होणार आहेत. भटक्या विमुक्तांच्या समस्यांवर बैठक लावण्याच्या संदर्भात राज्यमंत्री संजय राठोड, आमदार हरिभाऊ राठोड तसेच आमदार डॉ.
तुषार राठोड यांनी वारंवार आग्रह करुन मुख्यमंत्री यांना बैठक लावण्याची विनंती केली; मात्र हे सरकार सत्तेवर आल्यानंतर एकदाही बैठक झाली नाही. गेल्या दीड वर्षात ३ वेळा बैठक लावण्यात आली आणि ती वेळेवर रद्द करण्यात आली. ८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांसोबत सहय़ाद्री गेस्ट हाऊस येथे दोन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते; परंतु बंजारा आणि भटक्या विमुक्तांचे निमंत्रित कार्यक्रम आणि आमदार व मंत्री पंकजा मुंडे हजर असतानाही मुख्यमंत्र्यांच्या अनास्थेमुळे बैठक रद्द करण्यात आली. तेही कोणतेही कारण न देता बैठक रद्द झाली. पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा, या विषयावर मात्र बैठक झाली; परंतु स्थानिक माजी आमदार अनंतकुमार पाटील यांच्या भूमिकेमुळे पोहरादेवी विकासाच्या आराखड्याला खो घालण्यात आला. माजी केंद्रिय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांनी पोहरादेवीला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आणि त्यांच्या काळामध्ये मंजूर झालेले १0 कोटींपैकी ५.५0 कोटी अजूनही खर्च न झाल्यामुळे तोही निधी शासन परत करण्याच्या विचारात आहे. एकीकडे बंजारा समाजाची हेळसांड थांबत नाही आणि भटक्या विमुक्तांबद्दल मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांची अनास्था पाहून भाजप दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आ. हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे.