सलग १२ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवून महाराष्ट्राच्या जडण घडणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या वसंतराव नाईक यांची जयंती

विचारांच्या महानायकाला १ जुलै जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

सलग १२ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवून महाराष्ट्राच्या जडण घडणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या वसंतराव नाईक यांची आज जयंती. त्यानिमित्ताने वसंतराव नाईक यांची जडणघडन, राजकीय प्रवास, मुख्यमंत्री म्हणुन काम करताना त्यांनी घेतलेले महत्वपुर्ण निर्णय, महाराष्ट्रच्या राजकारणातील वसंतरावांचा ठसा आदी गोष्टींबद्दल जाणुन घेवूयात.

वसंतराव नाईक साहेब यांची जडणघडण
यवतमाळ सारख्या मागासलेल्या जिल्ह्यातील पुसद तालुक्यातल्या गहुली या गावात एका बंजारा कुटुंबात वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. अशा साधारण कुटंबात जन्मलेले असताना आणि कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसतना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे ही खरेतर आश्चर्याची गोष्ट आहे. गहुली गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे 3 किमी दूर असणाऱ्या गावात पायी प्रवास करून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. नागपूर मधील नील सिटी हायस्कुल मधून मॅट्रिकची १० वी ची परीक्षा वसंतराव नाईक उत्तीर्ण झाले. याच काळात त्यांना वाचनाची गोडी लागली. *अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक लढा त्याचबरोबर महात्मा फुले आणि डॉ.आंबेडकरांच्या कार्याचा वसंतरावांच्या मनावर प्रचंड प्रभाव पडत गेला.* नागपूर हे त्या काळी सामाजिक राजकीय चळवळीचं केंद्र मानलं जायच. नागपुरातील अशा वातावरणात त्यांची राजकीय सामाजिक जडण घडण झाली. व २૪ व्या वर्षी पदवी मिळवल्या नंतर त्यांनी पुढे एल.एल.बी. ची पदवी प्राप्त केली. पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकीली केली. आकर्षक व्यक्तिमत्व मनमिळावू स्वभाव गोरगरीब गरजू माणसांना मदत करण्याची वृत्ती यांमुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय वकील झाले. *आंतरजातीय विवाह वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी वत्सलाबाई या ब्राह्मण समाजातील मुली बरोबर नोंदणी पद्धतीने विवाह केला आणि जीवनातील पहिली क्रांती वसंतरावांनी केली.* *त्या काळी आंतरजातीय विवाह आणि नोंदणी पद्धतीने विवाह करणे याला क्रांतीच म्हणावे लागेल.* बंजारा समाजामध्ये असणाऱ्या जुन्या रूढी परंपरा यात बदल घडवून आणण्यासाठी वसंतरावांनी पुढाकार घेतला. आणि पुरुषांच्या बरोबरीने महिलानीही शिक्षण घ्यावे हे डोळ्यासमोर ठेवूनच बदल घडवण्यात यश मिळविले.

Vasantrao naik, Vasantrav Naikराजकीय प्रवास
शेती आणि शेतकरी हे त्यांचे जिव्हाळ्याचेच नव्हे तर अभ्यासाचे विषय होते. आपल्या जिल्ह्यातील शेतकर्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचा सपाटा वसंतरावांनी लावला. जनमानसातील प्रसिद्धीमुळे १९५२ च्या विधानसभा निवडणुकीला वसंतराव पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहीले आणि निवडूनही आहे. उपमंत्री झाले. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना महसूल हे महत्त्वाचं खाते देण्यात आलं. मारोतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले . त्यानंतर १९६३ ते १९७५ अशी सलग १२ वर्षे ते मुख्यमंत्री म्हणून राहिले. वसंतरावांनंतरच्या कोणत्याच मुख्यमंत्र्याला ५ वर्षाची टर्म सुद्धा पूर्ण करता आली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सलग १२ वर्षे मुख्यमंत्री राहणं ही सोप्पी गोष्ट नाही. वसंतरावांनी ते करुन दाखवलं. वसंतरावंसारखे सर्वमान्यांतून आकाराला अालेले नेतृत्व महाराष्ट्राला लाभल्यामुळे राज्याचे भले झाले. महाराष्ट्राच्या जडण घडणीच्या अत्यंत महत्वाच्या काळात महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळू शकलं परिणामी विकासाला योग्य आणि गतिमान दिशा मिळाली.
मुख्यमंत्री असताना घेतलेले महत्वपुर्ण निर्णय बारा वर्ष मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा पदभार सांभाळणार्या वसंतरावांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. मराठी भाषाला भाषेचा दर्जा मिळवून दिले, आता जसा पाण्याअभावी दुष्काळ पडतो तसा त्या काळी अन्नधान्याचा दुष्काळ होता. अन्ना अभावी लोकांचे मृत्य होण्याचे प्रमाण तेव्हा भयंकर होते. तेव्हा लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान होते. अन्नधान्याच्या समस्येवर, संकटावर मात करण्यासाठी त्यांनी “जय जवान जय किसान ” असा नारा दिला होता. भारतीयांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी अमेरिकेकडून गहू आयात करण्यात येत होता. पी.एल. ૪८० हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा गहू अमेरिकेतून येत होता. अशी अन्नधान्याची टंचाई पाहून “पुढच्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मला फाशी द्या” असं धाडसी विधान त्यांनी केलं आणि खरोखर महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत त्यांनी स्वयंपूर्ण करून दाखवला. शेतकऱ्यांना हायब्रीड बियाणे उपलब्ध करून दिले. कापूस एकाधिकार योजना राबविली. महाराष्ट्र दुधाची गरज पूर्ण करण्यासाठी गुजरात वर अवलंबून होता. त्यावर मात करण्यासाठी वसंतरावांनी कृषिमंत्री बाळासाहेब सावंत यांच्या मदतीने संकरित गाईंची खरेदी केली आणि दुग्धोत्पादनासाठी शेतकऱ्याना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिल. त्यांच्या या प्रयत्नामुळे, अल्पावधीतच महाराष्ट्रात धवलक्रांती घडुन आली. शेतीला आधुनिक स्वरूप देण्यासाठी त्यांनी कृषी विद्यापीठाची स्थापना केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मराठवाडा कृषी विद्यापीठ, कोकण कृषी विद्यापीठ या विद्यापीठांतील संशोधनामुळे महाराष्ट्राच्या कृषी विषयक ध्येयधोरणात वसंतरावांच्या काळात आमूलाग्र बदल घडून आला. उजनी,जायकवाडी,चासकमान, पेंच ,अप्पर वर्धा, धोम ही धरणे आणि पारस,खापरखेडा,कोराडी भुसावळ ही औष्णिक विद्युत प्रकल्प वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नातूनच उभी राहिली. विकासासाठी आवश्यक असणाऱ्या वीज आणि पाणी या मूलभूत गरजांची त्यांनी सोय केली. “पाणी आडवा, पाणी जिरवा” ही योजना त्यांच्याच काळातील. दुष्काळावर मात करण्यासाठी वि. स. पागे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली रोजगार हमी योजना वसंतरावांनी उचलून धरली. १९७२ च्या दुष्काळात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात आली. पुढे केंद्राने देखील या योजनेची दखल घेऊन महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणून हि योजना देशभरात राबविली. आज देखील ही योजना चालू आहे. १९६७ साली कोयना भूकंप झाल्यावर भूकंप ग्रस्त लोकांचे पुनर्वसन देखील त्यांनी केले. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यात वसंतरावांचा खारीचा वाटा आहे. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर लोकशाही चे विकेंद्रीकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पंचायत राज समितीचे अध्यक्षपद वसंतराव नाईक यांच्याकडे होते. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी केलेल्या पंचायत राज विषयीच्या शिफारशीनुसारच आजच्या जिल्हापरिषद, पंचायत समिती चा कारभार चालू आहे.महानायक वसंतराव कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांची जयंती “कृषी दिन” म्हणून साजरी केली जाते. वसंतरावांच्या कार्याची, संघर्षमय जीवनप्रवासाची दखल घेणारा “महानायक वसंत तू ” हा चित्रपट देखील २०१५ साली प्रदर्शित झाला आहे . मित्रहो, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणारे मुख्यमंत्री या सामान्य ज्ञानापूरते वसंतरावांना मर्यादित ठेऊन चालणार नाही . महाराष्ट्रासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या या नेत्याच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या क्षेत्रात दमदार कामगिरी करून महाराष्ट्राला अधिक उंचावर नेले पाहीजे. वसंतरावांनी घडवलेल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यावर जर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर महाराष्ट्रासाठी ही मोठी दुर्देवाची गोष्ट आहे. हरितक्रांतीचे प्रणेते, आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
राजकीय नेत्यांनी वसंतराव नाईक साहेब यांचा आत्मचरित्र वाचावे आणि महाराष्ट्राला वसंतराव नाईक साहेब यांच्या विचाराने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे हिच खरी आदरांजली होईल.
सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवण्यासाठी वसंतराव नाईक साहेब यांचे विचार शक्ती देणारे आहे, मनोबल वाढवणारे आहे, मजबूती व बळकट देणारे आहे.
आपण सर्वांनी आधुनिक वसंतराव नाईक साहेब यांना आदरांजली वाहुया.

भास्कर ना राठोड
ठाणे जिल्हा संघटक
भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था तथा सचिव भारतीय सेवा नाका कामगार संघटना.

Tag : Vasantrao Naik History, Vasant rao Naik Biography, Vasantrao CM Maharashtra