सेवालाल महाराजांच्या जयंती महोत्सवानिमित्त पेणमध्ये भव्य शोभायात्रा

Banjara-Pukar-logo

पेण (प्रतिनिधी) : सदगुरु संत श्री सेवालाल महाराज यांच्या 276 व्या जयंती महोत्सवानिमित्ताने पेण शहरात, पेण पंचायत समिती ते चावडी नाका तसेच आंबेघर ते गागोदे सेवालाल महाराज देवस्थान अशी सेवालाल महाराजाच्या प्रतिमेची भव्य रथातून सवाध्य शोभायात्रा, सेवालाल महाराजांच्या भाविकांनी काढून जयंती महोत्सव उत्साहात साजरा केला.

बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था व सेवालाल आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष आय.डी. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बंजारा समाज बांधवांसह सेवालाल महाराजाच्या भक्तांनी गागोदे देवस्थान येथे भक्तीभावाने व आनंदाने, उत्साहाने सेवालाल महाराजांच्या जयंती उत्सव साजरा केला. या कार्यक्रमास आ. धौर्यशील पाटील, गागोदे (खु.) ग्रा.पं. चे सरपंच शिवाजी पाटील, राधेश्याम आडे, संस्थेचे सचिव बबन राठोड, शंकर राठोड, धारसिंग राठोड, प्रताप राठोड, शेकाप तालुका सहचिटणीस भास्कर पाटील आदी अनेक मान्यवरासह पेण, अलिबाग, रसायनी, पाली या ठिकाणीचे बंजारा समाज बांधव व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांसह भाविकांनी संत श्री सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन यानिमित्ताने आयोजित केलेल्या महाप्रसादाचा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला. यानिमित्ताने गागोदे देवस्थानात भजनांचे कार्यक्रम झाले. देवस्थान परिसर विद्युत रोषणाईने तसेच रांगोळ्या काढून परिसर सुशोभित करण्यात आले होते.