संघटना म्हणजे काय माझ्या आकलन नुसार लिहण्याचं प्रयत्न केला आहे.
संघटना मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. प्रत्येकच माणूस त्याच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या संघटनेशी जुडलेला असतो. पण संघटन हे कृतीशील जीवनाचे द्योतक म्हणूनही ओळखले जाते. इतकेच काय तर मानवी जीवन प्रवाहित करण्याचे ते एक साधन आहे. मानवी इतिहास सुद्धा संघटनेच्या नैतिक आधारावरच लिहिला गेला आहे. मानवी उत्कर्षाच्या काळात संघटन हेच मानवी विकासाला प्रेरणा देणारे संजीवन ठरले होते. मानवी विकासाचा, उत्कर्षाचा, संघर्षाचा, यशाचा, धेय्यप्राप्तीचा, विजयाचा इतिहास संघटनेतूनच लिहिला गेला आहे. हे नाकारता येत नाही. पण हा फक्त एक इतिहास आहे हे सुद्धा विसरता येत नाही. तोही अश्या काळातला इतिहास जेव्हा कुठल्याही विचारांची, तत्वज्ञानाची, संकल्पनेची, विचारधारेंची, व्यवस्थेची नीटशी चौकटही बसविल्या गेली नव्हती. भावनिक गरजा आणि मानवी संघटीत जीवनाची गरज यातून इतिहासातील अनेक संघटना निर्माण झाल्या आहेत. समाज, संस्कृती, व्यवस्था अश्या कुठल्याही संकल्पनेच्या अभावी अनेक संघटना तयार झाल्या. पुढे याच संघटनांनी समाज, धर्म, जात, विचार, तत्वज्ञान, असे नाव धारण केले. त्यातूनच विचारांचे विभाजन, तत्वज्ञानाचे विभाजन हे सुद्धा होत गेल्याचा इतिहास आहे. प्रत्येक धर्माच्या तत्वज्ञानात्मक संघटनेतून फुटीरवादी बाहेर पडून त्याच संघटनेचा दुसरा प्रवाह सुरु झाला हे निर्विवाद सत्य कुणालाही नाकारता येत नाही. त्याचीच पाळेमुळे आजतागायत आपणही पालन पोषण करीत आहोत.गाजर गवतासारखे याही संघटना उदयास आल्या आणि काळाच्या ओघात लुप्त झाल्या. मात्र माणूस नावाचा भावनाशील माणूस इथेही कधीच संघटीत राहिला नाही. तो सतत विभाजत राहिला. तुटत राहिला. विखुरत राहिला. फक्त आणि फक्त संघटनेच्या नावाने.
मध्ययुगीन कालखंडाच्या शेवटी आणि आधुनिक कालखंडाच्या सुरवातीलाच जग नावाचे एक विशालकाय मानवी संघटन दृष्टीक्षेपात येऊ लागले. जे खंडात विभागले होते. संस्कृतीत विभागले होते. परिस्थितीने विभक्त होते. माणूस हा एकच समान धागा फक्त शिल्लक होता. पण इथेही व्यवसाय आणि वसाहतवाद जगाला २ भागात विभागून गेला. एक भाग पुंजीवादाकडे (भांडवलदार) तर दुसरा भाग श्रमिक (मजूर) म्हणून ओळखला गेला. फासिझम, नाझीझम नावाचे वैचारिक उग्रवाद त्यातूनच जगाने अनुभवले. मुसोलिनी, हिटलर नावाचे उग्रवादाकडून मानवी कल्याणाकडे जाणारे फासिझम, नाझीझम हे सुद्धा संघटनच होते. किती काळ चालले आणि आज त्यांचे अस्तित्व आणि तुकडे किती हे वेगळे सांगण्याची गरज भासू नये. याच धाग्याला पकडून जगाचे २ भागात विभाजन करणारा आणि हेगेल च्या आदर्शावादापासून प्रेरणा घेऊन आलेला मार्क्स हा सुद्धा वैचारिक संघटन घेऊन जगाच्या यशोशिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला. पुंजीवाद आणि श्रमिक असा भावनिक पण तितकाच व्यवहारिक प्रश्न घेऊन जगाला भन्नावून सोडणारा मार्क्सवाद आज आपल्याच विचाराच्या गलक्यात इतका पिचला गेला आहे की मार्क्सवादाचे नेमके संघटन कोणते हे ओळखणे दुरापास्त झालेले आहे.
या सर्व विवेचनात तत्कालीन समस्यांच्या पलीकडे कधीच कुठले संघटन गेलेले नाही. इतकेच नाही तर काही संघटनांचा ज्वाला तर अल्पावधीतच संपुष्टात आला. कालबाह्य विचार आणि संघटन झाले असतांना त्यांची धार कमी होणे शक्य होतेच पण त्यासोबतच ते तिथेच संपनेही तितकेच महत्वाचे होते. पण तसे झाले नाही. संघटन आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत. लेनिन, स्टालिन, माओ ही परंपरा जर मार्क्सवादाला लाभली नसती तर मार्क्सवाद सुद्धा गर्भावस्थेतच लुप्त झाला असता. मार्क्सवादी विचारप्रणाली व्यावहारिक पातळीवर असल्याने थोडाफार जागतिक प्रभाव पाडण्यात तो यशस्वी ठरला हे म्हणणे जितके धाडसाचे आहे. तितकेच मार्क्सवादाचा विपर्यास झाला असे म्हणणे सोपे जाते. श्रमिक संघटनेच्या नावाखाली झालेली खुद्द श्रमिकांची गळचेपी आणि सोबतच भांडवलदारांवर ओढवलेले संकट यातून मार्क्सवादी संघटनेची झालेली फाटाफूट जगानेच अनुभवलेली आहे. यावरून एक समान धागा मात्र हाच दिसून येतो की कुठेही समाज नावाची एकत्र संघटना प्रदर्शित होतांना किंवा टिकून राहतांना दिसून आली नाही. इतकेच काय वैचारिक पातळीवरील एकताही कधीच दिसून आली नाही. समाज नावाची संघटीत आणि एकत्र संघटना सतत विभाजित करण्याला या धार्मिक अधिष्ठान असलेल्या, वैचारिक अधिष्ठान असलेल्या व व्यावहारिक अधिष्ठान असलेल्या सर्व संघटना जबाबदार ठरल्या आहेत. एवढे म्हणण्याचे धारिष्ट्य मात्र निच्छितच करता येईल. एकत्र-सर्वसमावेशक समाजाची, सामाजिक आंदोलनाची, लढ्याची व्याख्या या संघटनेच्या माध्यमातून कधीही होतांना दिसून आली नाही. ती का केली गेली नाही ? हा आज तुमच्या आणि माझ्यासमोरचा प्रश्न आहे.
२० व्या शतकात कुठेतरी थोडासा दिलासा मिळतो तो असा की, मानवतावादाची जागतिक मुहूर्तमेढ या काळात रोवण्याचा प्रयत्न झाला. मानवी कल्याणाचे वैचारिक वादळ निर्माण झाले. स्थितीस्थापत्य वादाकडून मानवी समाज दूर होऊ लागला. नैतिक आचरण आणि समान न्यायाच्या संकल्पनेने संघटनेची पाळेमुळे ढीसूळ होऊन समाजाचे संघटन आणि न्यायासाठीचा लढा देण्याचा हा काळ ठरला. परंतु याही काळात काहींनी न्यायाच्या लढ्यासाठी काही संघटना निर्माण केल्या. आणि त्या संघटनेच्या छत्रछायेखाली समाजाचे संघटन घडवून आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. भारतात तर पुनरुत्थानाच्या काळात अश्या अनेक संघटना जन्माला आल्या. पण नंतरच्या काळात मात्र या संघटना विस्कळीत झाल्या. समाजाचे संघटन आणि राजकारण या गर्तेत महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटना सापडल्याने अनेकांनी वेगळी वाट धरली आणि हळूहळू महाराष्ट्रात संघटनांचे महापूर येऊ लागले. आज तर गल्लीबोळात संघटना आणि त्यांच्या नेत्यांचे मोठमोठे ब्यानर रस्त्यारस्त्यात झळकतांना दिसून येतात. पण समाजाचे संघटन कधीही यांच्या पाठीशी नसते. कारण संघटनेतील नेतृत्वाच्या कलहाने समाजाचे संघटन कसे विस्कळीत झाले हा इतिहास समाजाला माहित आहे. गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत आणि पृथ्वीवरील सर्वच देशांमध्ये एका संघटनेतून अनेक संघटना निर्माण झाल्या आहेत. कुठेही सामाजिक संघटन होतांना दिसून आले नाही.
इथे मी संघटनेला बाजूला सारून सामाजिक संघटन (एकत्रीकरण) याला अधिक महत्व देत असतांना अनेक प्रशासनिक अभ्यासक असे म्हणतात की, व्यवहारात संघटनेशिवाय, त्याच्या विशिष्ट नेतृत्वाशिवाय कुठलाही लढा व आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही. प्रशासकीयदृष्ट्या त्यांची मते योग्य असली तरी समाजाच्या संघटीतपणा इथे दुर्लक्षित केला जातो आहे. आजपर्यंत संघटना अनेक झाल्या. परंतु समाजाचे संघटन होऊ शकले नाही. हे मी वारंवार या ठिकाणी सांगत आहे. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वात ज्या संस्था संघटना निर्माण झाल्या. त्यांनी समाजाचे संघटन (एकत्रीकरण) समान कृती कार्यक्रमाच्या आधारे घडवून आणले. परंतु त्या वेळेचे नेतृत्व आणि परिस्थिती आणि आजचे नेतृत्व आणि परिस्थिती यात फार मोठी तफावत आहे.समाज एकत्रित का राहू शकला नाही ? फाटाफूट का झाल्या ? अनेक नेते, अनेक गट, अनेक संस्था, अनेक संघटना का निर्माण झाल्या ? समाजाची संघटीत शक्ती का विभागल्या गेली ? समाजात आपआपसात फुट का पडली ? समान कृती कार्यक्रमात अंतर्गत भेद का निर्माण झाले ? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे. वेगवेगळ्या संघटना आणि त्यांचे नेतृत्व त्याला जबाबदार ठरले.
आणखी किती दिवस आम्ही या संघटना निर्माण करण्यात आणि त्यांचे अध्यक्षरुपी नेतृत्व निवडण्यात घालविणार आहोत. समान ध्येयाने, समान उद्धिष्टाने, समान कृतीकार्यक्रमाणे आम्ही कुठलेही संघटन निर्माण न करता समाजाला एकत्र करू शकणार नाही का ? आज बंजारा समाजात सर्वांना भेडसावणा-या समस्या समान आहेत. विचार, तत्वज्ञान आणि लढा सर्वांचा समान असतांना उत्स्फूर्तपणे समाज एकत्र येणार नाही का ? जिथे पदाचा कुठलाही संघर्ष राहणार नाही. गोरमाटी चळवळ आणि सेवालाल व वसंतरावजी नाईक यांचे विचार हा धागा पकडून बंजारा तरुणांचे, बंजारा समाजाचे एकत्रीकरण होऊ शकणार नाही का ? सेवालाल विचारांना मानणारा प्रत्येक माणूस त्यात स्वतःला समाविष्ठ करून घेईल. त्यासाठी समाजासमोर जे काही ध्येय व उद्धिष्ट मांडायचे ते सर्व वैयक्तिक पातळीवरचे नसून समाज पातळीवरचे राहतील. *आम्हीअजूनहीका त्या इतिहासातील संघटनांचेच वलय ठेवून पुन्हा एकदा समाजाच्या संघटीत शक्तीला कुठल्या तरी संघटनेत विभागू पाहत आहोत ? संघटनेचा हेका तीच माणसे धरतात ज्यांच्यात नेतृत्वाचा स्वार्थ पराकोटीचा असतो. आणि अशी माणसे कधीही समाजाचे वर्तमान आणि भविष्य निर्धारित करू शकत नाही. समाजाने अश्या माणसांपासून सावध राहण्याची गरज आह*े.
कायदा जेव्हा व्यवस्थेच्या मुळाशी असतो तिथे संघटनेला नाही तर समाजाला केंद्रित केले जाते. व्यवस्थेचे रूप धारण करू शकणारे वैश्विक विचार आणि तत्वज्ञान सोबत आहे. सर्व असले तरी समाज दुभंगला आहे. तो एकत्रित नाही. संघटीत नाही. त्यामुळे अनेक पातळ्यांवर समाजाची पीछेहाट सुरु झालेली आपण उघड्या डोळ्याने पाहत आहोत. समाज संघटीत नसल्याने हे सर्व होत आहे. समाजाकडे त्याचे संघटीत नैतिक पाठबळ नसल्याने व्यवस्थेवर समजाचा दबाव निर्माण होऊ शकत नाही. आज तर इतकी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की, कुठलेही विधायक कार्य हाती घेतांना समाजाचे नैतिक पाठबळ त्या आंदोलनाला, लढ्याला मिळेल की नाही अशी शंका येते. ही नकारात्मक मानसिकता सुद्धा संघटनांच्या फाटाफुटीमुळेच निर्माण झालेली आहे. आज समाजाच्या एकत्रीकरणावर भर देणे गरजेचे झाले आहे. समाज एकसंघ राहिला, संघटीत राहिला तर निश्चितच वास्तवात असलेल्या आणि वसंतरावजी नाईक साहेबांनी दिलेल्या मुलभूत AIBSS संघटना मजबूत होतील. आज कुठल्याही संघटनेची गरज नाही तर समाजाच्या एकसंघतेची गरज निर्माण झालेली आहे. आपसातील मतभेद विसरून प्रत्येकाने गोरमाटी या नात्याने एकत्र येऊन एकसूत्री कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आणि तीच भविष्याच्या निर्मितीची पायाभूत भूमिका ठरेल.
लेखक. पंडित राठोड बदलापुर.
प्रमुख प्रतिनिधी. रविराज एस.पवार.
ऑनलाइन बंजारा न्यूज पोर्टल
Website. www.GoarBanjara.com
8976305533