जलक्रांतीचे बीजरोपन करणारे सुधाकरराव नाईक प्रा. दिनकर गुल्हाने दुष्काळ आणि पाणीटंचाईने पोळणाऱ्या महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्यासाठी सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांतीची बिजे रोवली. स्वतंत्र जलसंधारण खाते निर्माण करून जलसंधारणाच्या कामांना गती देत राज्याला जलसमृद्धीची दिशा दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा स्मृतिदिन “जलसंधारण दिन’ म्हणून(10 मे) महाराष्ट्र शासन राज्यभर साजरा करते. यानिमित्त त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप… गहुलीच्या मातीने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले.
हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक आणि जलसंधारणाचे प्रणेते सुधाकरराव नाईक. या काका-पुतण्यांनी जवळपास 14 वर्षे महाराष्ट्राचे समर्थपणे नेतृत्व केले. वसंतराव नाईक यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ साडेअकरा वर्षांचा. पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणीचे कार्य करताना आधुनिक शेती तंत्रज्ञानातून त्यांनी हरितक्रांतीचे स्वप्न साकारले. सुधाकरराव नाईक यांनी 1991 मध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात प्रचंड धडाडी आणि अचूक निर्णयक्षमतेने मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात अमीट ठसा उमटविला. दुष्काळ आणि पाणीटंचाईने पोळणाऱ्या महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्यासाठी जलक्रांतीची बिजे रोवली. स्वतंत्र जलसंधारण खाते निर्माण करून जलसंधारणाच्या कामांना गती देत राज्याला जलसमृद्धीची दिशा दिली. अचूक निर्णयक्षमता आणि दूरदृष्टीचे निर्णय याबाबतीत सुधाकररावांची मोठी ख्याती होती. वसंतराव नाईक यांच्या सहवासाने आणि विचारांनी परिपक्व झालेले त्यांचे नेतृत्व वेगळेपण ठेवून होते.
गहुलीच्या सरपंच पदापासून पुसद पंचायत समिती सभापती, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत पंचायतराजच्या प्रत्येक टप्प्यावर ग्रामीण यंत्रणेची त्यांना खडान्खडा माहिती होती. राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री या सत्ताप्रवासात प्रशासनाची नाडी त्यांनी जाणली. कल्याणकारी योजना जनतेच्या दारात पोचत नाही, याची त्यांना खंत वाटत होती. मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर यंत्रणेवर त्यांचा दरारा निर्माण झाला. त्यांचा मुख्यमंत्री पदाचा अल्पकाळ धाडसी आणि दूरदृष्टी असलेल्या निर्णयांनी गाजला. परिणामतः प्रशासन गतिमान बनले आणि योजनांचा लाभ जनसामान्यांपर्यंत पोचला. विशेषतः राजकारणी आणि गुंड वृत्तीच्या संबंधाचे त्यांनी केलेले विच्छेदन यामुळे त्यांची जनमानसातील प्रतिमा उंचावली. या प्रतिमेचे पूजन आजही समाजातून केले जाते. “”सुधाकररावांची मुख्यमंत्री पदाची कारकिर्द म्हणजे उत्कंठावर्धक अन् चित्तथरारक वन डे क्रिकेट मॅच होय.” असे त्यांच्या कारकिर्दीचे चपखल शब्दात वर्णन माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांनी केले आहे.
सुधाकररावांच्या सृजनशील निर्णयाने तंत्रशिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या दारात पोचली आहे. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात उपेक्षित शिक्षण खात्याला त्यांनी झळाळी दिली. महाराष्ट्रात विनाअनुदान तत्त्वावर अभियांत्रिकी महाविद्यालये उघडण्याचा निर्णय त्यांनी 1983 मध्ये घेतला आणि पाहता पाहता महाराष्ट्रात तंत्रशिक्षणाची क्रांती घडून आली. त्यांच्या काळात मुलींना शिक्षण शुल्कमुक्त झाले. मुली आणि सेवारत महिलांना वसतिगृह लाभले. अमरावती विद्यापीठ, तसेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना झाली. मुख्यमंत्री पदानंतर सुधाकररावांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून राजवस्त्रे अंगावर घातली; परंतु काळी माती आणि मराठी मनाशी नाळ जुळलेल्या सुधाकररावांना सिमल्यात करमले नाही. ते पुसदच्या बंगल्यात परतेल. तेव्हा त्यांनी केलेल्या बंगल्यातील हृदयस्पशी भाषणाचा शब्द – न् – शब्द अजूनही मनात घोळतो. “”सांजवेळी पक्षी आपल्या घरट्यात परतात. मी ही आयुष्याच्या संध्याकाळी माझ्या पुसद मतदार संघाच्या घरट्यात परतलो आहे. मंत्रीपदाच्या व्यस्ततेमुळे मला मतदारसंघात फारसे फिरता आले नाही. आता गावा-गावात लोकांना भेटणार!” सुधाकररावांचा स्वभाव कणखर आणि बाणा करारी होता. दिलेला शब्द पाळणे हा त्यांचा स्वभावगुण. नियमाच्या चाकोरीत काम होत असेल तरच होकार, अन्यता समोरच्या व्यक्तीला नकार देताना त्यांचा स्पष्टपणा जाणवत असे.
युवावस्थेत सुधाकरराव यांच्यावर सर्वोदयी नेते विनोबा भावे यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. सुधाकरराव मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांच्या निर्णयांनी राजकीय पंडितांना अनेकदा चकित केले. साहित्यिक आणि पत्रकारांवर त्यांचे प्रेम होते. स्वच्छ मन, मनाची सहृदयता आणि रसिकता त्यांच्या ठायी होती. “जलसंधारणातून समृद्धी नांदू शकते,’ हा त्यांचा चिरंतन विश्वास त्यांनी शेवटपर्यंत जपला. मुख्यमंत्री पदानंतर राज्य जलसंधारण सल्लागार परिषेदेचे अध्यक्षपद स्वीकारून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जलसंधारण ही जनचळवळ करण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!
TAG: Sudhakarrao Naik CM, Maharashtra,