मानोरा (प्रतिनिधी) : गोर बंजारा संविधानिक हक्क महासमिती द्वारा बंजारा समाजातील सर्व संघटना मिळून बंजारा समाजातील मागण्या व समस्या संदर्भात मुंबई येथील आझाद मैदानावरुन 18 मार्च 2015 ला विधान भवनावर मोर्चा काढण्यासंदर्भात नियोजनासाठी पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज मंदिरात 19 फेब्रुवारी 2015 ला सभा संपन्न झाली. सभेला बंजारा समाजाचे धर्मगुरु संत रामराव महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.टी.सी. राठोड अध्यक्ष ऑल इंडिया बंजारा सेवा संघ महाराष्ट्र राज्य हे सभेचे अध्यक्ष होते.
बंजारा समाजाच्या प्रमुख मागण्या जसे * 300 लोकवस्ती असलेल्या तांडय़ाला महसुली दर्जा स्वतंत्र ग्रामपंचायत मंजुर करावी. * बंजारा व्हीजेएनटी यांना लावलेली क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करा. * मॅटने दिलेला निकाल रद्द करुन पदोन्नतीचा नविन जी.आर. काढावा. * बंजारा समाजाला अनुसुचित जमाती प्रमाणे संविधानीक आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र शासनाला शिफारस करावी. * बंजारा जमातीची जनगनना करावी. * बंजारा विमुक्त भटक्या जाती लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थ संकल्पात आर्थिक तरतुद करा. * तांडा विकास योजना फक्त तांडय़ासाठी राबवा व तांडा विकास महामंडळ कर्नाटक राज्याप्रमाणे स्थापन करा. * स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्वतंत्र राजकिय आरक्षण द्या * आंध्र, कर्नाटक व इतर प्रांतातून आलेल्या बंजारा बांधवांना आरक्षणाची सवलत द्या व क्षेत्रीय बंधन रद्द करा. * बांधकाम कामगार, नाका कामगार, ऊसतोड कामगार, मच्छीमार कामगार तसेच महिलांचे सक्षमीकरणासाठी विशेष सोयी सवलती उपलब्ध करुन द्या, ऊसतोड कामगाराच्या मुलांना शिक्षण सुविधा पुरवा. * बंजारा भटक्या व विमुक्त जमातीच्या मुलामुलींना केजी ते पीजी पर्यंतचे सर्व शिक्षण शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्थात मोफत मिळाले पाहिजे, दर्जेदार शिक्षणाची सोय निर्माण करा. * भूमीहीन बेरोजगार युवक युवतींसाठी जमीन, उद्योग, धंद्यासाठी स्वस्त दराने कर्ज उपलब्ध करुन द्या. * बंजारा भवन उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जागा व निधी उपलब्ध करुन द्या 9 वसंतराव नाईक विकास महामंडळाला 1000 कोटी तात्काळ मंजुर करण्यात यावे व महामंडळावर बंजारा समाजाचा अध्यक्ष नेमण्यात यावा.
या सर्व मागण्या व समस्या संदर्भात मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चाला महान तपस्वी संत रामराव महाराज उपस्थित राहणार असून लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बंजारा समाजाचे धर्मगुरु संत रामराव महाराज, गोर बंजारा संविधानिक हक्क महासमिती व बंजारा समाजातील सर्व संघटना मिळून हा निर्णय घेतला आहे. सभेला बंजारा समाजातील सर्व संघटनेचे पदाधिकारी अशोक राठोड चंद्रपूर, आर.डी. राठोड पुसद, राधेश्याम आडे मुंबई, काशीनाथ राठोड नांदेड, बळीभाऊ राठोड मंगरुळपीर, आत्माराम जाधव जळगाव, शालीग्राम राठोड मंगरुळपीर, भाऊ नाईक मा.जि.प. सदस्य सुनिल महाराज, जितेंद्र महाराज, अशोक चव्हाण पं.स. सदस्य, प्राचार्य टि.व्ही. राठोड, अनिल राठोड, खुशाल राठोड प्रा.आर.डी. चव्हाण, भाऊराव जाधव, प्रकाश राठोड, प्रा. दिलीप चव्हाण, सुधाकर राठोड, मनोज राठोड, विलास राठोड दिग्रस, दिनकर चव्हाण, वसंत चव्हाण, प्रा. विजय जाधव, प्रा. जय चव्हाण, शालीकराम राठोड, विलास राठोड, आकाराम चव्हाण, पी.जी. राठोड, जाणश्रिसिंग महाराज, प्रकाशभाऊ राठोड दिग्रस, अनिल राठोड बीबी, गजानन राठोड आमकिन्ही, गोविंद महाराज, संजय राठोड दाभळी, रामेश्वर राठोड ठाणे व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सभेचे आयोजन महंत कबीरदास महाराज यांनी केले.