सिंधू संस्कृतीचा विनाश-एक चिंतन

इतिहास हा वर्तमानकाळाला प्रभावीत करत असतो, म्हणजेच वर्तमान कालीन समस्यांची मुळे इतिहासात असतात. इतिहास संशोधनाच्या बाबतीत अलीकडील काळात नवनव्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. इतिहासातील अनेक घटनांबाबतीत संशोधनाअंती ठोस निष्कर्ष काढण्यासाठी अडथळे निर्माण होताना दिसतात. संशोधन करत असताना जो तो संशोधक प्रस्थापित इतिहास लेखनाच्या प्रकारातून करत असताना दिसतो. त्यामुळे एखाद्या घटनेचा अन्वयार्थ लावने कठीन जात आहे. अशीच एक इतिहासात विविध मतमतांतरे असलेली घटना म्हणजे सिंधु संस्कृतीचा विनाश होय. सिंधू संस्कृतीचा विनाश कसा झाला याबाबतीत अनेक इतिहास. कारांमध्ये मतभेद आहेत. त्यात मार्शल, मैके, एस.आर. राव हे विद्यान असे सांगतात की, नद्यांना आलेल्या पुरामुळे सिंधू संस्कृतीचा विनाश झाला. सिंधूकालीन नगरे नद्यांशेजारी वसलेली होती. त्यामुळे वरील विद्वानांचे हे लॉजीक असावे. मात्र पुराव्याअभावी हे लॉजीक मला तरी संयुक्तीक वाटत नाही.

आरेल स्टेन, एस.एन. घोष या विद्वानांच्या मते सिंधू संस्कृतीचा विनाश जलवायू परिवर्तनाने झाला. भरमसाठ जंगलतोडीमुळे नद्या ओसाड पडल्या आणि दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊन अन्नाविना लोक मृत झाले असावे त्यामुळे सिंधू संस्कृतीचा विनाश झाला. हे मतही ऐतिहासिक पुराव्यांअभावी टिकू शकत नाही. भूवैज्ञानिक एम.आर. साहनी यांच्या मते सिंधू संस्कृतीचा र्हास हा अतिवृष्टीमुळे झाला तर एच.टी. लैंब्रीक आणि माधव स्वरुप वल्स यांच्या मते नदीप्रवाहातील बदलामुळे सिंधू संस्कृतीचा विनाश घडून आला. एम. दिमीत्रायव या रशियन विद्वानाच्या मते सिंधू संस्कृतीचा विनाश भूकंप अथवा ज्वालामुखीने झाला असावा तर कांही विद्वान सिंधू संस्कृतीच्या विनाशास आर्थिक परिस्थिती जबाबदार मानतात. सिंधू संस्कृतीच्या विनाशाबाबतची वरील सर्व मतमतांतरे ठोस पुराव्याअभावी योग्य निष्कर्षाप्रत जात नाहीत. वरील मतमतांतराशिवाय गार्डन चाईल्ड, स्टुअर्ट पिगट, व्हीलर आदी विद्वानांच्या मते सिंधू संस्कृतीचा विनाश हा बाह्य आक्रमनामुळे झालेला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरही याच मतास दुजोरा देतात. इ.स.पू. 1500 ला आर्यांनी अचानक आक्रमन करुन सिंधू संस्कृतीचा विनाश घडवून आणला असे या विद्वानांचे मत आहे. सिंधू संस्कृतीच्या विनाशाबाबत वरीलप्रमाणे संशोधन झालेले दिसून येते. मात्र हे संशोधन करत असताना योग्य पुराव्यांचा शोध घेतला गेला की नाही याबाबतीत मी संभ्रमीत आहे. अलीकडील काळात जे नवीन संशोधन होत आहे त्यातून असे स्पष्ट होत आहे की, आजच्या भटक्या जमाती ह्या सिंधू संस्कृतीच्या वारसदार आहेत या भटक्या जमातीपैकीच बंजारा ही जमात सिंधू संस्कृतीची वारसदार आहे हे मी स्वतः अनेक इतिहास परिषदांतून विविध शोधनिबंध लिहून स्पष्ट केलेले आहे. याशिवाय इतिहासकार मा.म. देशमुख, रा.ना. चव्हाण, प.रा. देशमुख. लक्ष्मण माने, प्रा. मोतीराज राठोड, आत्माराम राठोड, पाक्षीक केसूलातून 1 ते 15 जुलैदरम्यान लिहीला गेलेला अश्विनकुमार राठोड याचा ‘बंजारा समाजेतिहासाची मांडणी हा लेख’ या सर्व विद्वानांचे मत बंजारा जमात आणि सिंधू संस्कृती यांचे नाते स्पष्ट करते. इतिहास हा जरवर्तमानकाळाला प्रभावित करत असेल तर इतिहासाचे संशोधन अचूक होने गरजेचे आहे.

इतिहासात पुरावे बोलत असतात. एखाद्या गुहेतील हजारो वर्षाचा अंधार नष्ट करण्याची लाकत जशी आगपेटीतील एखादी छोटीशी काडी करत असते त्याचप्रमाणे इतिहासाला नवे वळन देण्याचा प्रयत्न एखादा नविन ऐतिहासिक पुरावा अथवा इतिहासाचे साधन करत असतो. मग तो पुरावा प्राथमिक असेल वा दुय्यम असेल. अशाच एक सिंधू संस्कृतीच्या विनाशाबाबत भाष्य करणारा पुरावा बंजारा लोकगितात आढळून येतो. अद्यापपर्यंत सिंधू संस्कृतीच्या विनाशाबाबत ज्या ज्या विद्वानांनी मतमतांतरे मांडली आहेत त्यांनी या पुराव्याकडे दुर्लक्ष केलेले दिसून येते. याची विविध कारने आहेत. त्यातील कांही मुख्य कारने म्हणजे, प्रस्थापितांनीच इतिहास लिहीला, भाषेचा अडसर, भटक्यांकडे पाहण्याचा हीन दृष्टीकोन, सर्वांगिन विचार न करता लोकगितांकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टीकोन आदी असावीत. गार्डन चाईल्ड, स्टुअर्ट पिगट, व्हीलर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी विद्वान सिंधू संस्कृतीच्या विनाशास आर्यांचे आक्रमन कारणीभूत समजतात. याच मताला बंजारा लोकगितातून पुष्टी मिळते. ते लोकगित पुढीलप्रमाणे आहे.

 

सिंधू नदीर पाळेम ।

सात सिंदूरे राळेम ।

आर्य दामडिया दामड लगागिरे ।

मारा सेना नायक ।।1।।

आपने मोवना नगरेन ।

बाळजाळन कोल्या करनाकेरा ।

मारो सेना नायक ।।2।।

हाडापारे आसरेन कना जायारे ।

मारा सेना नायक ।।3।।

वरील लोकगित हे बंजारा भाषेतून आहे. कदाचीत बंजारा भाषा सिंधू संस्कृतीच्या विनाशाबाबत भाष्य करणार्या विद्वानांना येत नसावी म्हणून हा सबळ पुरावा दुर्लक्षीत झालेला असावा. अथवा जानूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केले गेले असावे. वरील बंजारा भाषीय लोकगिताचा अर्थ मराठीत असा होतो की, ‘मोहेंजोदडो नगरावर आर्यांनी आक्रमन करुन तेथे मोठय़ा प्रमाणात जाळपोळ केलेली आहे. त्यामुळे आता हडप्पाच्या आसर्याला जाने गरजेचे आहे.’ सिंधू संस्कृतीच्या विनाशाबाबत भाष्य करणारा वरील पुरावा म्हणजे इतिहास संशोधनातील ,एक मैलाचा दगड आहे. या पुराव्यामुळे मार्शल, मैके, एस.आर. राव, आरेल स्टेन, एस.एन. घोष, भूवैज्ञानिक एम.आर. साहनी, एच.टी. लैंब्रीक आदी विद्वानांची मते कालबाह्य ठरतात. आणि सिंधू संस्कृतीचा विनाश हा आर्यांच्या आक्रमनामुळेच झाला हे स्पष्ट होते. राहिला प्रश्न तो लोकगिताला इतिहासाचे एक साधन म्हणून किती महत्त्व द्याचे तो याबाबत मला असे म्हणावेसे वाटते की, लॉजीक वापरुन मते मांडण्यापेक्षा बंजारा लोकगित महत्त्वाचे आहे. निश्चितच बंजारे हे सिंधू संस्कृतीचे वारसदार आहेत. लोकगिते ही केवळ छंद म्हणून गायली जात नसतात. तर त्यातून तत्कालीन काळातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती स्पष्ट होत असते. आणि तोच इतिहास वरील बंजारा लोकगितातून स्पष्ट झालेला आहे. त्यामुळे सिंधू संस्कृतीच्या विनाशावर नविन प्रकाश पडलेला आहे असे मला वाटते.

प्रा. बी.एन. राठोड
शारदा नगर, लातूर
मो. 9421362277