पोहरादेवीचा विकास प्राधान्याने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ना. संजय राठोड, संत रामराव बापू यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक
यवतमाळ, दि. ०१ – गतवर्षीच्या अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथील संत सेवालाल महाराज समाधीस्थळाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. तीर्थक्षेत्र विकासांतर्गत पोहरादेवीच्या विकासाला प्राधान्य देऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे आयोजित बैठकीत दिली.
​महसूल राज्यमंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने दि. ३० मार्च रोजी मुख्यंमंत्र्यांच्या दालनात पोहरादेवी विकास आराखड्यासंदर्भात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, ना. संजय राठोड यांच्यासह पपू संत श्री रामराव बापू, आ. हरिभाऊ राठोड, आ. तुषार राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत पोहरादेवी विकासावर व रामनवमीनिमित्त कार्यक्रमासाठी उपस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.
​यावेळी ना.संजय राठोड यांनी यापूर्वी सह्याद्री अतिथीगृहात वाशिमचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. राजेंद्र पाटणी आदिंच्या उपस्थितीत पोहरादेवी विकास आराखड्यासंदर्भात्‍ पार पडलेल्या बैठकीचा आढावा घेतला. समाजातील सर्व घटकांना व स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून पपू रामराव बापू यांच्या मार्गदर्शनात पोहरादेवीचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याचे ना. राठोड यांनी यावेळी सांगितले. पोहरादेवी विकास आराखडा हा १३० कोटी रूपयांचा असून गेल्या अर्थसंकल्पात पोहरादेवीच्या विकासाकरीता शासनाने पहिल्या टप्प्यात ११ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून पायाभूत सुविधांसह भक्तनिवास, वनउद्यान, सौंदर्यीकरण अशी कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत.
​या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी हे संपूर्ण भारतातील बंजारा समाजाचे भक्तीस्थळ असल्याने येथील विकास हा राष्ट्रीय मानांकानुसार त्याच दर्जाचा झाला पाहिजे, त्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असे आश्वस्त केले. दरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी श्री रामराव बापू यांचे दर्शन घवून समाजातील समस्या सोडविण्याबाबत व विकासाबाबत पुढाकार घेवू असे सांगितले. यावेळी विधानपरिषदेचे आ. हरिभाऊ राठोड यांनीही राम नवमी उत्सवास उपस्थित राहण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली. बैठकीस समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संत, महंत उपस्थित होते.
00000000

(टीप : सोबत मा. मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीतील बैठकीचे छायाचित्र जोडले आहे.)
PHOTO : CM Baithak.jpg
Poharadevi vikas