सर्वात गरीब कालाहांडी जिल्ह्यात आदिवासी बंजारा समाजाची दयनिय अवस्था- Madhukar Pawar

Banjara Samajacha daniya

अकोला (प्रतिनिधी) : ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव प्राचार्य डॉ. मधुकर पवार यांचा ओरीसा राज्यातील बंजारा समाजाचा सामाजिक, राजकीय, आर्थिक व शैक्षणिक अभ्यास दौरा करण्यासाठी दि. 27, 28,29 व 30 डिसेंबर 2014 ला भारतातील 751 जिल्ह्यापैकी सर्वात गरीब असलेला ओरीसा राज्यातील कालाहांडी जिल्ह्यात सौ. हर्षमाला पवार सरचिटणीस, ऑल इंडिया बंजारा सेवा संघ महिला आघाडीसह दौरा आटोपून नुकतेच अकोला येथे आगमन झाले. तिन दिवसात त्यांनी मुसाफली तांडा, टेंमरा तांडा, किलडोंगरी तांडा, दहेरा तांडा, डेंगागुडा तांडा, घंटीगुडा तांडा, सारसमाळ तांडा, महिचला, जुनागढ, आमपाणी, पुझारीगुडा, नवापाडा, बिरीमहन, भवानीपट्ना, हंसपाडा, टेंडापाली, बहेरा तांडा, येथील बंजारा आदिवासी तांडय़ातील वास्तव जिवन जगणार्या तांडय़ातील लोकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. त्यानुसार त्यांची घरे कौलाची व गवताची अत्यंत लहान असून बंजारा महिला हापशीवर अर्धनग्न अवस्थेत आंघोळ करतात. पुरुष मंडळी गावाजवळच्या अर्धा एकर असलेल्या लहान लहान तलावात आंघोळ करतात. महिलांना आंघोळ करण्यासाठी घरात जागाच नाही. 95 टक्के मजूर वर्ग असलेल्या या समाजाचे मजुर संध्याकाळी मजुरी सोबतच एक पाऊच दारु घेतल्या नंतरच ते घरी जातात. प्रत्येक मजुरला दारुचे पाऊच दिले नाही तर ते कोणत्याही मालकाकडे मजुरीला जात नाहीत. बदक पालन करणे, कोंबडी पालन करणे, चिरीचे झाडापासून टापले, सुपडे, झाडु इत्यादी वस्तु तयार करुन संसाराचा उदर निर्वाह करीतात. एवढेच नाही त्यांच्या घरात लाईन नसून 15- 15 दिवस केरोसिन-रॉकेल त्यांना मिळत नाही. त्यामुळे ते रात्र अंधारातच काढतात.

अर्धनग्न अवस्थेत अंगावर कपडे असून सावकाराकडून मजुर वर्ग कर्ज घेतल्यानंतर 12 महिने सुद्धा त्यांचे सावकाराचे कर्ज फिटत नाही. त्यामुळे त्यांचे सामाजिक जिवनमान अत्यंत क्लेशदायक आणि दुःख दायक आहे. शिक्षणाचे प्रमाण नगण्य असून ओरीसा राज्य समाजाचा मेळावा दि. 29 डिसेंबर रोजी पुजारीगुडा येथे संपन्न झाला. राज्यातील 9 जिल्ह्यातील आदिवासी बंजारा समाजातील एक हजार महिला व पुरुष या मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्याचे उद्घाटन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव प्राचार्य डॉ. मधुकर पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष, ओरीसा राज्याचे अध्यक्ष तुळाराम नायक चव्हाण, प्रमुख अतिथी म्हणून ओरीसा राज्याचे उपाध्यक्ष किशोसरसिंग नायक, कालाहांडी जिल्ह्याचे अध्यक्ष ललीत नायक चव्हाण, महाराष्ट्र राज्याच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस हर्षमाला मधुकर पवार, ओरिसा राज्याचे कोषाध्यक्ष संथाकुमार नायक, उपाध्यक्ष राजेंद्रनायक, राष्ट्रीय सरचिटणीस गणेश्वर लावडीया, राज्याचे कार्याध्यक्ष विनोद बिहारी नायक, राज्याचे सरचिटणीस सकरु राठोड, कुमा नायक, माजी जि.प. सदस्य घनश्याम नायक, भुपद्र नायक उपस्थित होते. या प्रसंगी ओरीसा राज्यातील पहिली महिला शिक्षीका सुमित्रा नायक, ओरीसा राज्यातील पहिले वकील जिनुतबहान नायक, ओरीसा राज्यातील पहिली महिला डॉ. निरुपमा राठोड, ओरीसा राज्यातील पहिले बी.टेक. पदवी प्राप्त करणारी महिला कुमुदीनी राठोड यांचा सत्कार प्राचार्य डॉ. मधुकर पवार यांच्या हस्ते करण्यात आला. ओरीसा राज्यातील 27 जिल्ह्यापैकी 9 जिल्ह्यात बंजारा समाज वास्तव्य करतो. त्यामध्ये कालाहांडी जिल्ह्यात 80 तांडे, संबलपूर जिल्ह्यात 40 तांडे, बालांगीर जिल्ह्यात 37 तांडे, कोरापड जिल्ह्यात 31 तांडे, सुंदरगड जिल्ह्यात 10 तांडे, झारसुगुडा जिल्ह्यात 25 तांडे, बरगड जिल्ह्यात 30 तांडे, नवापाडा जिल्ह्यात 27 तांडे व मलमानगिरी जिल्ह्यात 12 तांडे आहेत. एकूण लोकसंख्या 2, 12, 768 एवढी आदिवासींची बंजारा समाजाची लोकसंख्या आहे. एकंदरीत उच्च शिक्षणाचे प्रमाण एक टक्के असून प्राथमिक शिक्षणाचे प्रमाण फक्त 20 टक्के आहे. या राज्यामध्ये आदिवासी बंजारा समाजाचे मजुरांचे प्रमाण 83 टक्के असून या राज्यातील बंजारा महिला ह्या शेतमजुरीसाठी शेतावर जात नाहीत. तर महिला वर्ग ह्या घरगुतीच कामे करतात.

एकंदरीत भारताला स्वातंत्र्य मिळून 68 वर्षे होवून देखील ओरीसा राज्यातील आदिवासी बंजारा समाजाची विदारक अवस्था पाहली असता भारतीय राज्य घटनेला काळीमा फासेल अशा प्रकारची दयनिय परिस्थिती ओरीसा राज्यातील आदिवासी बंजारा समाजाची आहे. या संदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओरीसा राज्याचे मुख्यमंत्री नविन पटनायक यांना भेटून कालाहांडी जिल्ह्याध्ये आर्थिक सुधारणेचे पॅकेज दिल्या जावे यासाठी चर्चा करण्यासाठी भेटणार आहोत.