Sunil bhau rathod

निवडणूक आयोगाने उद्या मंगळवारी पत्रकार परिषदेचा मुहूर्त निश्चित केला असून सूत्रांच्या सांगण्यानुसार उद्या निवडणुकीची घोषणा केली जाईल आणि आचारसंहिता लागू होईल. सूत्रांच्या सांगण्यानुसार १७ किंवा १८ ऑक्टोबर रोजी मतदान होईल आणि कदाचित दिवाळीपूर्वी म्हणजेच २१ ऑक्टोबरपूर्वी मतमोजणी होऊन नवीन सरकार कुणाचे असेल हे निश्चित होईल.
महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण असलेला गणेशोत्सव आज सोमवारी संपत आहे. गणेशोत्सवामध्ये आचारसंहितेचे सावट येऊ नये आणि राजकीय पक्षांना गणेशोत्सवापासून लांब रहावं लागू नये व हा उत्सव धडाक्यात साजरा व्हावा म्हणून निवडणुका जाहीर करण्याचा निर्णय लांबवण्यात आला होता. मात्र, आता निवडणूक आयोगाने मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेण्याचे निश्चित केले असून दिल्लीतल्या पत्रकारांनाही सविस्तर माहिती देण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. मतदान एकाच टप्प्यात घेण्याचेही निश्चित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती असून मतदान ९ आक्टोबर रोजी घ्यायचे की १७ ऑक्टोबर यावरून विचारमंथन सुरू होते. पण ताज्या माहितीनुसार १७ किंवा १८ ऑक्टोबर या दिवशी मतदान घेण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.