विकासाचा महामेरू।
सर्व समाजास आधारू।
सकळ मार्गाचा निर्धारु।
एकमेवाद्वितीय तू।।
या ओळीप्रमाणे वसंतरावजी नाईक साहेबांचे सामाजिक कार्य उजळून निघाले. समाजाबद्दलची तळमळ अंगी बाणवलेली असताना जीवनभर त्याच्या ध्यासाने प्रेरित होऊन समाजाचे ऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला .वसंतरावजी नाईक यांना सामाजिक कार्याचा वसा त्यांचे वडील स्व. फुलसिंगजी नाईक यांच्याकडून मिळाला. कुमार वयामध्येच त्यांनी त्यांच्या वडिलांची समाजाविषयी ची तळमळ जवळून पाहिली. त्यांच्या वडिलांना बंजारा समाजाची शैक्षणिक प्रगती व्हावी असे मनोमन वाटत होते. बंजारा परिवर्तन टीमचे नेतृत्व त्यांच्या वडिलांनी करून समाजाची सामाजिक, शैक्षणिक प्रगती व्हावी, त्यासाठी परिवर्तन टीमच्या सभेत ठराव मंजूर केले. समाजाचे हित जोपासण्याचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. स्वतःचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना आजूबाजूच्या गावी जावे लागले. लहानपणापासूनच शिक्षणासाठी पायपीट व चटके सोसून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.वसंतरावजी नाईकांनी पुढील शिक्षणासाठी अमरावती, नागपूरला जाऊन पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण चालू असताना ते दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आल्यावर बाजार हाट या दिवशी समाजातील लोकांशी हितगुज करून, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असत. वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण करून वसंतरावजी नाईक पुसद येथे प्रॅक्टिस करीत असताना गोरगरीब, वंचित ,उपेक्षित लोकांना तांड्याच्या समस्या तांड्यातच समोपचाराने सोडवण्याचा सल्ला देत असत. त्यासोबतच त्यांचा अनेक गाव, वस्ती, तांडे व शहरातील लोकांसोबत परिचय वाढत गेला. त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश केला. व सन 1952 मध्ये प्रथम पुसद विधानसभा जिंकली व पहिल्याच प्रयत्नात त्यांना मध्यप्रदेश विधानसभेत उपमंत्री पद मिळाले.
जमीन :-
बंजारा समाज हा जमीनदाराची शेती कुळाने करत होता ,कुळाने शेती करून सुद्धा आता केवळ पोटापाण्याचा प्रश्न तात्पुरता सुटत होता. परंतु त्याव्यतिरिक्त त्यांना काहीच प्रगती करता येत नव्हती. या शोषण पद्धतीमुळे बंजारा समाज मागे खेचला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रामसिंगजी भानावत व बाबुसिंगजी राठोड यांनी तरुण वयातच जमीनदार विरोधात जमीनदारी निर्मूलन आंदोलन छेडले होते व विदर्भ कुळ सेवा संघाची स्थापना करून कुळाने शेती करणाऱ्याची बाजू शासनस्तरावर मांडत होते .बंजारा -दलित- आदिवासी समाजाच्या स्थैर्यासाठी, कुळाने शेती करणाऱ्यास त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी सन 1952 मध्ये वसंतरावजी नाईक यांनी कुळ कायदा पास केला.कायद्याचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्यासाठी रामसिंगजी भानावत व बाबुसिंगजी राठोड यांनी संपूर्ण मध्य प्रदेश पिंजून काढला व वकील मंडळ सोबत घेऊन अनेक जिल्ह्यात सभेतून लोकांना कायद्याची माहिती दिली. विदर्भ मराठवाड्यात जमीनदारांनी हजारो एकर जमीन स्वतःकडे ठेवली होती.या जमिनी बंजारा समाज वयती करत होता, मात्र ती जमीन त्यांच्या नावे होत नव्हती. मध्यप्रदेशात कुळ कायदा मंजूर होऊनही योग्य अंमलबजावणी होत नव्हती, त्यावेळेस बाबासाहेब नाईक ,रामसिंगजी भानावत,बाबूसिंगजी राठोड, हिरा सदा पवार, मुडे गुरुजी , चंद्राम गुरुजी, के.एल. नाईक यांनी प्रसंगी आंदोलन उभारून कुळाची जमीन गोरगरीब बंजारा समाजाला मोठ्या संघर्षाने मिळवून दिली. त्यामागे वसंतराव नाईक साहेबांची प्रेरणा होती. कायद्यानुसार जमिनीचे हस्तांतरण झाले तरीही अनेक जमीनदाराकडे हजारो एकर जमीन पडून होती, त्याचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे होते. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली .भूदान चळवळ ही एक पवित्र चळवळ आहे, या चळवळीत आपण पूर्ण शक्तीनिशी उतरले पाहिजे असे वसंतरावजी नाईक यांनी मनाशी पक्के ठरविले. वसंतरावजी नाईक साहेबांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना भूदान चळवळीत तन-मन-धनाने कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाने रामसिंगजी भानावत, बाबुसिंगजी राठोड, मुडे गुरुजी, चंदूसिंग नाईक यांनी यवतमाळ जिल्ह्यात फिरून कार्यकर्त्याचे मोठे जाळे निर्माण केले .राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना यवतमाळ जिल्ह्यात दहा हजार एकर जमीन भुदानात मिळाली त्यामागे वसंतरावजी नाईक यांचा मोठा हातभार लागला.भुदानात मिळालेली जमीन गोरगरीब बंजारा, दलित-आदिवासी -धनगर व इतर मागास वर्गीयांना वाटप केली. कुळ कायदा व भूदान चळवळीत हजारो एकर हक्काच्या जमिनी बंजारा समाजातील गोरगरिबांना मिळवून देण्यात वसंतरावजी नाईक साहेबांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे बंजारा समाजाचा पोटापाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघाला.
संघटन :-
बंजारा बंधुंनो जागे व्हा।एक व्हा। असा संदेश देत पहिल्या अखिल भारतीय बंजारा (All India Banjara Seva अधिवेशनाचा प्रचार करण्यात आला. दिनांक 30 व 31 जानेवारी 1953 रोजी ठक्कर बापा नगर,दिग्रस (मध्य प्रदेश)येथे बंजारा अधिवेशन घेण्यात आले .अखिल भारतीय बंजारा युवक परिषद दिग्रसचे कार्यकारी पदाधिकारी प्रतापसिंगजी आडे, रामसिंगजी भानावत, उत्तम राठोड ,कमल सिंग राठोड,गजानन राठोड, तेजसिंग राठोड, हिरालाल चव्हाण ,मोहनसिंग पवार या पदाधिकाऱ्यांनी पहिल्या बंजारा अधिवेशनाच्या आयोजनाची जय्यत तयारी केली. या अधिवेशनाचा उद्देश बंजारा समाजाचे संघटन करून सर्वांगीण उन्नतीचे मार्ग शोधणे आणि त्यावर ठोस उपाययोजना अंमलात आणण्याचे प्रयत्न करणे हा होता. बंजारा अधिवेशनाचे उदघाटक लाल बहादूर शास्त्री रेल्वेमंत्री (भारत सरकार) हे होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष वसंतरावजी नाईक,राजस्व उपमंत्री (मध्य प्रदेश) हे होते. या अधिवेशनाचे खास निमंत्रित पाहुणे आचार्य दादा धर्माधिकारी,नागपूर, पंडित रविशंकर शुक्ल, मुख्यमंत्री (मध्य प्रदेश) हे होते. तत्कालीन स्थितीत जवळजवळ एक कोटी संख्या असलेल्या आणि भारताच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या बंजारा समाजाला संघटित करून एका सूत्रात बांधण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. इतर प्रांतात जरी हा विखुरलेला असला तरी भाषा, राहणीमान आणि विचारसरणी याबाबतीत सगळीकडे समान असल्याचे निदर्शनास आले. बंजारा समाज हा अत्यंत मेहनती असून याची नेहमीच निरनिराळ्या घटकाकडून पिळवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामागे समाजाचा अशिक्षितपणा व अज्ञान हीच कारणे आहेत.अनिष्ट रूढी व परंपरा यांच्यावर विश्वास ठेवून आजपर्यंत तो मागे पडला आहे, पण आता काळ बदलला आहे. जर बदलत्या काळाच्या या प्रवाहाबरोबर पाऊले उचलली नाही, तर बंजारा समाज सर्वांच्या मागे राहील. त्यामुळे वेळीच सावध होण्याची आवश्यकता असल्याचे या अधिवेशनात स्पष्ट करण्यात आले व त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर बंजारा समाजाचे मोठे संघटन स्थापन करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले.त्याचवेळेस अखिल भारतीय बंजारा सेवा संघाची स्थापना करण्यात आली. सेवा संघाला मोठे करण्यात रामसिंगजी भानावत यांचे संघटन कौशल्य पणाला लागले. त्यांच्या सोबत हिरा सदा पवार,मुडे गुरुजी, चंद्राम गुरुजी, बाबुसिंग राठोड,के.एल. नाईक, प्रतापसिंग आडे ,के.टी. राठोड, रणजीत नाईक, वसराम पाटील,चंदूसिंग नाईक,सोनबाजी नाईक यांचे मोठे योगदान लाभले आहे. अखिल भारतीय बंजारा सेवा संघाच्या चळवळीला वसंतरावजी नाईक साहेबांनी भरघोस राजकीय पाठबळ दिले, हे बंजारा समाज कदापि विसरणार नाही. त्यामागे त्यांची दूरदृष्टी व राजकीय ताकतदीचा मोठा आधार होता.
शिक्षण:-
शिक्षणामुळे मानवाचा सर्वांगीण विकास होतो. त्यानुसार सामाजिक सुधारणा परिवर्तन हे शिक्षणानेच होऊ शकते, समाजातील दारिद्र्य मिटवण्यासाठी शिक्षण हे मोठे आयुध असल्याचे सिद्ध झाले आहे.बंजारा समाज हा ग्रामीण भागात विकल अवस्थेत जीवन जगत असल्यामुळे त्याचठिकाणी राहण्याच्या, जेवणाच्या व अभ्यासाच्या पूरक सोयीसुविधा निर्माण करून शिक्षण देणे गरजेचे होते, त्याशिवाय शिक्षणाचा प्रसार होणार नाही याची जाणीव त्यांना होती. वसंतरावजी नाईक साहेबांना आपले प्राथमिक शिक्षण व उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक गावी भटकावे लागले होते, त्यामुळे गरीब, वंचित समाजातील घटकांना त्याचठिकाणी सर्व सोयींनीयुक्त शिक्षण देण्याची गरज त्यांच्या लक्षात आली. बंजारा समाजाचे समाजसुधारक रामसिंगजी भानावत यांनी भटक्या विमुक्तांसाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आश्रमशाळा सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला होता, त्यांच्या आश्रमशाळा या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचे नाईक साहेबांनी ठरविले. महाराष्ट्रात विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी आश्रम- शाळा उघडण्याचा निर्णय घेतला ,आश्रमशाळा निर्माण करून बंजारा भटक्या उपेक्षित वर्गाला शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. त्यामुळे बंजारा समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला व समाजाने जी काही प्रगती केली ती शिक्षणाने साध्य झाल्याचे निदर्शनास येते. या आश्रमशाळा बंजारा समाजासाठी वरदान ठरल्या व त्या माध्यमातून समाजातील होतकरू मुलांनी शिक्षण घेऊन यशोशिखर गाठले आहे. महाराष्ट्र राज्यात वसंतरावजी नाईक साहेबांनी विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी आश्रमशाळा निर्माण करून शिक्षणक्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली.
आरक्षण :-
श्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या राज्यस्तरीय विमुक्तांचे अधिवेशन सोलापूर येथे आयोजित केले, या अधिवेशनाचे मुख्य प्रवर्तक वसंतरावजी नाईक होते. या अधिवेशनानंतर नाईक साहेबांनी भटक्या-विमुक्तांची सूची जाहीर केली. महाराष्ट्रात बी.डी.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशीनुसार बंजारा जाती व उपजातींची सूची महाराष्ट्र शासनाने विमुक्त जातीच्या रूपात सन.1965 मध्ये घोषित केली. बंजारा जाती अनुक्रमांक सात मधील सूची शासन निर्णयाने पारित करून बंजारा समूहातील तत्सम जाती व भटक्या-विमुक्तांना चार टक्के सवलती वसंतरावजी नाईक साहेबांनी मिळवून दिल्या. भारतात सर्व राज्यात बंजारा समाजाला एकसारखे अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी पहिल्या अधिवेशनापासूनच प्रयत्न करण्यात आले. त्यानंतरच्या सेवा संघाच्या प्रत्येक अधिवेशनात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळणेबाबत ठराव मंजूर करण्यात आले व त्यानुसार पाठपुरावा केल्याचे आढळते. सन 1961 केंद्र सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे नवीन मापदंडाचे वर्गीकरण करण्यासाठी लोकूर समिती समोर, बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी सेवा संघाचे पदाधिकारी रामसिंगजी भानावत व रणजित नाईक यांनी साक्ष नोंदवली. वसंतरावजी नाईक साहेबांच्या सल्ल्याने 24 ते 26 ऑगस्ट 1966 ला ऑल इंडिया बंजारा सेवक शिबिराचे आयोजन करण्यात आले.त्यामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्याचे ठरले. त्यानुसार 8 सप्टेंबर 1966 रोजी रकाबगंज गुरुद्वारा ,दिल्ली येथे बंजारा समाजाचे राष्ट्रीय स्तराचे कॉन्फरन्स घेण्यात आले. या कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी, संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या भाषणात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचे बिल संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडण्याबाबत अनुकूलता दर्शविली.त्यानुसार संसदेमध्ये दुरुस्ती बिल क्रमांक 119 /1967 मांडण्यात आले, परंतु तांत्रिक कारणाने हे बिल पास होऊ शकले नाही.
बंजारा समाजाला आरक्षण देण्याबाबत आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी भारतातील बंजारा समाजाचे सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक स्तराचे सर्वेक्षण करण्यासाठी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाने ” बंजारा स्टडी टीम” ची स्थापना दिनांक 4 /10 /1967 रोजी केली.ही टीम संपूर्ण भारत देशाचा दौरा करून त्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट वसंतरावजी नाईक साहेबांना सोपविला, व त्यांच्या सल्ल्याने इंदिरा गांधी यांच्यासोबत चर्चा करून बंजारा समाजाला आरक्षण देण्यासाठी 1972 ला दुसऱ्यांदा बिल संसदेमध्ये मांडण्यात आले परंतु अनुसूचित जमातीच्या सर्व खासदारांनी संसदेमध्ये त्या बिलास विरोध केल्यामुळे ते बील पास होऊ शकले नाही.
वसंतरावजी नाईक साहेबांच्या उपस्थितीत ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे सहावे अधिवेशन 1975 मध्ये नाईक नगर ,मुंबई येथे आयोजित करण्यात आले या अधिवेशनात सेवा संघाचे सर्व पदाधिकारी व नाईक साहेबांसह बंजारा आरक्षणावर चिंतन बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत परत आरक्षण मागणीचा जोरदार पाठपुरावा करण्यात येईल असे ठरले. बंजारा स्टडी टीम रिपोर्ट व पार्लमेंटरी कमिटीच्या रिपोर्टसह दिल्ली येथे सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संसदे मध्ये तिसऱ्यांदा बिल मांडले.यावेळेस अनुसूचित जमातीच्या 42 खासदारांनी इंदिरा गांधी यांच्याकडे आपला राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला, त्यामुळे संसदेमध्ये बिल पास होऊ शकले नाही.ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे पदाधिकारी यांनी फार मोठे प्रयत्न करूनसुद्धा यश पदरी पडत नव्हते तरी त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाही, त्यामागे वसंतरावजी नाईक साहेबांची मोठी प्रेरणा होती.
बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी सेवा संघाचे पदाधिकारी सतत धडपड करीत होते, ही मागणी सतत लावून धरणे गरजेचे असताना वसंतरावजी नाईक साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन चालूच होते. या विषयावर सेवा संघाचे पदाधिकारी व नाईक साहेब यांच्या अनेकवेळा बैठका पार पडल्या व नव्या जोमाने परत आरक्षणाचे बिल संसदेत कसे मांडता येईल व त्यामध्ये कसे यशस्वी होऊ, याचे नियोजन चालू होते. त्याच कालावधीत सेवा संघाचे प्रमुख मार्गदर्शक वसंतरावजी नाईक यांचे अनपेक्षितपणे निधन झाले. त्यामुळे सेवा संघाचे सर्व पदाधिकारी सुन्न झाले. बंजारा समाजावर व सेवा संघावर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यातून सावरून परत नवीन जोशाने सेवा संघाचे महासचिव रामसिंगजी भानावत,रणजित नाईक व सुधाकरराव नाईक यांनी पुसद येथे 1981 मध्ये बंजारा समाजाचे अधिवेशन घेण्याचे ठरविले, व त्या अधिवेशनात इंदिरा गांधी उपस्थित झाल्या, त्यांनी परत एकदा बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी संसदेत बिल मांडण्याबाबत आश्वासन दिले. इंदिरा गांधींच्या पुढाकाराने चौथ्या वेळेस संसदेमध्ये बिल मांडण्यात आले, परंतु परत अनुसूचित जमातीच्या खासदारांनी प्रचंड विरोध केल्यामुळे संसदेत बिल पास होऊ शकले नाही त्यामागील कारणमीमांसा केली असता, वसंतरावजी नाईक साहेबां- सारखा त्या तोडीचा नेता समाजाकडे नसल्यामुळे ते शक्य होऊ शकले नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. नाईक साहेबांना आणखी थोडे आयुष्य मिळाले असते तर निश्चितच संपूर्ण देशात बंजारा समाजाला एकसंघ अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित मिळाले असते हे मान्य करणे क्रमप्राप्त आहे.
बंजारा समाज आरक्षण व सवलतीचा फायदा उपभोगत आहे, त्यामागे वसंतरावजी नाईक व रामसिंगजी भानावत यांनी केलेल्या कष्टाचे फळ आहे, हे कदापि विसरता येण्यासारखे नाही.वसंतरावजी नाईक साहेब मुख्यमंत्री असताना बंजारा समाजाच्या सर्वांगीण समाज समाजसुधारणा व विकासाचे कार्य बळीरामजी पाटील, रामसिंगजी भानावत व जेता पंतू नाईक या समकालीन द्रष्ट्या समाजसुधारकांच्या आणि सह विचारी सोबत्यांच्या शक्ती व युक्तीने पूर्णत्वास नेले.या तिन्ही समाजसुधारकांना व त्यांच्या सामाजिक चळवळीला नाईक साहेबांनी पाठिंबा व प्रोत्साहन दिले.त्यांच्या समाजकार्याचा आदर करणे,हेच तर नाईक साहेबांचे बलस्थान आहे. नाईक साहेबांनी समाजाला हक्काची जमीन, देशव्यापी संघटन, सर्व सोयीयुक्त शिक्षण व समाजिक आमूलाग्र बदल करणारे आरक्षण या चतुःसूत्री कार्यक्रमाने देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आज चाळीस वर्षानंतरसुद्धा आपण त्यांच्या कार्यातून व विचारातून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्याचे उपाय अधिक परिणामकारकपणे राबवू शकतो एवढे बंजारा समाजासाठीचे समाजकार्य त्यांनी समाजासाठी उभे केले आहे. वसंतरावजी नाईक साहेबांचे समतेचे व्हिजन जिथे आजचे नेते समजू शकले नाही, परंतु त्यांची विकासनीती समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या कार्यातून भविष्यात अनेक समाजसेवक व त्यांच्या अनेक पिढ्या वसंतरावजी नाईक साहेबांना मोठ्या आदराने लक्षात ठेवतील.
त्यांच्या 41 व्या स्म्रुतिनिमित्त्य विनम्र अादरांजली….
जय बंजारा जय सेवालाल
लेखक
सुरेश राठोड,रूडावत
पुसद जि.यवतमाळ
मो.नं.8805107804
Tag : Vasantrao Naik, Ex CM Vasant Rao Naik, Vasantroa Naik Punyatithi, Vasantrao Naik Jayanti, Vasantrao NaikPunyatithi 18 August, AIBSS, all India Banjara Seva Sangh