माझे परममित्र प्रा. प्रकाश राठोड यांनी त्यांच्या लेखकत्वाची नैतिक जबाबदारी पेलून ‘बंजारा समाज साहित्य आणि संस्कृती’ हा ग्रंथ बंजारा समाजाच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी उपलब्ध करुन दिला त्याबद्दल त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. त्यांच्या मनातील पृथ्वीमध्ये उभाटलेल्या गुंतागुंतीच्या डोंगररांगांमधून क्रांतीचा ज्वालामुखी अस्वस्थ झाला आणि बंजारा समाजाचा सांस्कृतिक लाव्हा प्रवाहित होऊन वाहू लागला. त्यांच्या पृथ्वीच्या पोटातून अस्वस्थ लाव्ह्याचे प्रवाहित होणे म्हणजे त्यांच्यातील लेखणपणाला प्रज्ञानजन्मा करणेच होय. त्यांच्या ह्या प्रज्ञानजन्माने प्रकाश राठोड यांचे बोट धरले आणि बंजारा समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाची उजेडवाट प्रकाश राठोड यांनी या ग्रंथातून तयार करुन दिली. ही बाब परिवर्तनमूल्याचा अविष्कार करणारांसाठी अत्यंत गौरवाची आहे. मराठी वाङ्मयातील नवनिर्मिकांच्या महोत्सवात आपण त्यांचे स्वागत करु यात. बंजारा समाजामध्ये आत्माराम राठोड, मोतीराज राठोड, ग.ह. राठोड, पंजाब चव्हाण अशा अनेक छोटय़ा छोटय़ा क्षितिजांचा जन्म झाला आहे. परंतु या क्षितिजांचे क्षितिजांतर अजूनही झाले नाही.
या क्षितिजांमधील क्षितिजोत्तम क्षितिज कुणालाही म्हणता येणार नाही. कारण त्यांच्या हृदयावर क्रांतीची बीजाक्षरे त्यांनी कोरली असली तरी त्यांच्यातील क्रांतीच्या या बीजाक्षरांनी पारंपरिक स्थितीशीलतेचा किनारा सोडला नसल्यामुळे त्यांची वाढ समग्रकांती झाली नाही. बंजारा समाजाचा हा सांस्कृतिक संक्रमणकाळ आहे. प्रकाश राठोड या संक्रमणकाळातील लेखक आहेत. त्यांनी ‘बंजारा समाज साहित्य आणि संस्कृती’ या ग्रंथातील लेखांमधून परिवर्तनाचा ध्येयवेडेपणा केला आहे. त्यांनी बाबासाहेबांच्या बोटाच्या दिशेने जाण्याचा जाणवीपूर्वक निर्धार केला आहे. त्यामुळे त्यांच्या क्षितिजावर धम्ममेत्ताची पहाट झाली आहे आणि आंबेडकर सूर्य उगविण्यासाठी या ग्रंथातील लेखांमधून त्यांनी प्रबोधनपर्व सुरु केले आहे. त्यासाठी प्रकाश राठोड यांनी विचारशून्यतेचा किनारा उद्ध्वस्त केला आहे आणि ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु । सब्बे होन्तुच खेमिनो, सब्बे भद्रानि पस्सन्तु । मा कित्र्चि दुःखमागमा’ या विचारतत्त्वाचे निष्ठापूर्वक अनुगामित्व पत्करले आहे.
आता ते बंजारा समाजाच्या अस्तित्वाचे संविधान लिहीण्याची तयारी करीत आहेत असे त्यांच्या ग्रंथातील लेख वाचत असताना निदर्शनास येते. ‘बंजारा समाज साहित्य आणि संस्कृती’ हा ग्रंथ चार भागात विभागला आहे. पहिल्या भागात बारा वैचारिक लेख आहेत. दुसर्या भागात सहा परीक्षणे/समीक्षणे आहेत. तिसरा भाग मान्यवरांच्या मुलाखतींचा आणि चौथ्या भागात दोन परिशिष्टे आहेत. प्रकाश राठोड यांनी घेतलेल्या मुलाखीती सोडून सर्वच लेखांमधील लेखन माणूसमूल्य प्रस्थापित करण्यासाठी शोषणाच्या उद्धटपणाशी कराव्या लागणार्या निर्णायक लढय़ाचे त्रोत नजरेपुढे ठेवून केले आहे. प्रकाश राठोड प्रकटिक केलेले हे बुद्धिवादी आणि समतावादी प्रमाणशात्र आहे.
हे प्रमाणशात्र प्रमाण मानण्याचे कारण बंजारा जमातीच्या अंधारवाटा चार्वाक-बुद्ध-फुले-बाबासाहेब या प्रज्ञाकरांच्या उजेडाने उजळून निघतील असा त्यांना दृढ विश्वास आहे, हे आहे. हा ग्रंथ भटक्या विमुक्तांच्या बौद्धिक आणि वैचारिक भटकंतीचे प्रतिनिधीत्व करणारा ग्रंथ आहे. या ग्रंथाने थोडा वेगळा विचार करायलाही भाग पाडले आहे. बंजारा ही भटके-विमुक्त या समूहामधील एक जमात आहे. अशा अनेक जमाती या समूहाच्या सभासद आहेत. या समूहातील सभासद जमातींनी विषमतावादी जीवनप्रणाली सोडून सर्वांगीण विकासाच्या उजेडाची बेरीज करीत शोषणकेंद्रांविरुद्ध संग्रामसंस्कृती निर्माण करावी असे त्यांना वाटते. या सभासद जमातींना शोषणसूत्रात बांधून ठेवण्यासाठी सत्तानायकांनी तयार केलेली भटके-विमुक्त ही अव्यवस्था आहे. यातील प्रत्येक जमात म्हणजे दैववादाच्या कारखान्यात काम करण्यासाठी सत्तानायकांनी तयार केलेले कॅम्प आहेत. हे ओपन कोंडवाडे आहेत. भटकी ही त्यांची दशा आहे. हालत आहे आणि विमुक्त ही त्यांची स्थितीशीलता आहे. सीमा आहे.
विमुक्त या खुल्या बंदीगृहात भटकंतीचे रुप धारण करुन जीवन जगत राहण्याची प्रस्थापित व्यवस्थेने जमातींना दिलेली ही संधी आहे. या संधीचा विग्रह होऊ नये यासाठी सर्वतोपरी व्यवस्थेकडून काळजी घेतली जात आहे. कारण त्यांच्या अव्यवस्थेचे विश्लेषण झाले आणि त्यांच्या दोनतेमध्ये समानतेचे आणि बंधुत्वाचे तत्त्व आहे हे सिद्ध झाले तर त्यांच्यामध्ये अवस्थांतर होईल आणि अवस्थांतरामुळे निर्माण झालेली परिवर्तनाची पाऊलवाट अस्तित्वाच्या लढय़ाकडे वळेल याची भिती शोषणस्वामींना वाटते. त्यामुळेच या सभासद जमातींना मुक्ततेचा दर्जा दिला आणि जमातीय शोषणाच्या सारण्या तयार केल्यात. या सारण्यांनी आता स्वतःच्या पायात अग्निशिखांचे पैंजण बांधावे आणि अत्तदीपत्वाच्या लेखणीने प्रज्ञानाचे प्रास्ताविक लिहीण्यासाठी मूल्यसंघर्श करावा यासाठी प्रकाश राठोडांनी या ग्रंथामधून धडपड केली आहे. त्यांची ही धडपड गरिबीच्या भक्तांनी लिहीलेल्या भुकेच्या तत्त्वज्ञानाशी युक्तिवाद करण्यासाठी नाही. कारण बुद्धाने भुकेचे समर्थन कधीच केले नाही हे त्यांना माहीत आहे. ही त्यांची धडपड ईश्वर, आत्मा, दैववाद, कर्मकांड यांचे तांडे ध्वस्त करुन केवळ विचारशून्यतेत रममाण होण्यासाठी नाही. कारण विचारशून्यता म्हणजे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भाव प्रकट होत नाही असा विचार होय, याची त्यांना जाणीव आहे. अशा भावरहित विचारांमधून सर्जनाची प्रक्रियाच नष्ट होत असते. त्यामुळे नवनिर्मितीचे संस्थापन होत नाही. अशा विचारांमधून नव्या व्यवस्थेची प्रस्थापना करता येत नाही हे त्यांना ठाऊक आहे.
म्हणूनच बंजारा समाजाचे आक्रंदन संपविण्यासाठी आणि विषमतेचे निर्मुलन करण्यासाठी त्यांनी ‘बंजारा समाज साहित्य आणि संस्कृती’ या ग्रंथातील लेखांमधून सर्जनाच्या अनेक कार्यशाळा संयोजित केल्या आहेत. त्यामुळे त्यांची ही धडपड समरकर्ता झाली आहे असे म्हणणे उचित होईल. आता आपण थोडे लेखांच्या शीर्षकांविषयी बोलू यात. या ग्रंथातील पहिल्या लेखाचे शीर्षक ‘बंजारा जमात व बौद्ध दृष्टिकोन’ असे आहे आणि शेवटच्या लेखाचे शीर्षक ‘आठवणीतील आत्माराम’ हे आहे. यातील प्रत्येकच शीर्षक वाचकांशीस संवाद साधणारे आहे. शब्दांच्या महासभेत सन्माननीय शब्दांनी सभेची सुरुवात करावी अशी ही शीर्षके आहेत. प्रत्येकच शीर्षक त्या लेखातील मर्मबंधाचा परमप्रवक्ता आहे असे शीर्षक वाचताक्षणीच वाटते. प्रा. प्रकाश राठोड अन्वेषक आहेत. संशोधक आहेत. त्यांनी बौद्ध दृष्टिकोनाचे संशोधन केले आहे. बौद्ध दृष्टिकोन विकाससन्मुख आहे. आत्मा, परमात्मा, पारलौकिकता, अंधश्रद्धा, भक्ती, तृष्णेचा अतिरेक यांचे लोढणे मेंदूत अडकविणारा बौद्ध दृष्टिकोन नाही.
कोणत्याही स्वामित्वाचे हिटलरीकरण या दृष्टिकोनाला मान्य नसते. समतेच्या सम्यक प्रस्थापनेसाठी हा दृष्टिकोन स्वतःचे अस्तित्व पणाला लावीत असतो. हे प्रकाश राठोड यांनी अभ्यासले आहे. असा हा दृष्टिकोन समजावून घेण्यासाठी वर्चस्ववादाच्या वसाहतींविरुद्ध युद्धाचे नेतृत्व करताना ज्यांचे मन संग्रामछावणी झाले त्यांचे युगनायकत्व प्रा. प्रकाश राठोड डॉ. यशवंत मनोहरांच्या घडवणुकीतील संग्रामपाडाव असलेले एक घडण आहेत असे त्यांच्यासंदर्भात म्हणणे त्यांच्यासाठी गौरवाचीच बाब ठरते. प्रा. प्रकाश राठोड यांच्या ग्रंथातील अत्यंत महत्त्वाचा भाग मुलाखतींचा आहे. या भागात डॉ. यशवंत मनोहर, आत्माराम राठोड, ग.ह. राठोड आणि पंजाब चव्हाण यांच्या प्रस्तुत ग्रंथाच्या लेखकाने घेतलेल्या मुलाखती आहेत. प्रा. प्रकाश राठोड यांनी सर्वच अंगांनी विचारलेले प्रश्न आणि जीवनसौंदर्याच्या जबाबदारीचे भान ठेवून वाङ्मयीनदृष्टय़ा सशक्त वैचारिकतेच्या अविष्कारातून त्या प्रश्नांची दिलेली उत्तरे भटक्या-विमुक्तांमधील सर्वच सभासद जमातींसाठी त्यांची जीवनशैली बदलणार्या सम्यक तरतुदी आहेत. आधुनिक भारताच्या मुख्य प्रवाहात भटक्या-विमुक्तांनी यावे यासाठी मुलाखतींमधून या तरतुदींचा तपशील आलेला आहे आणि तो अनुकरणीय आहे. विरान आयुष्याच्या माळरानावर वेचलेल्या शेणुल्या जाळून पकविलेल्या पाणग्यांनी ग्लोबलाईज व्हावे आणि आधुनिकीकरणाचे ग्लोबलतत्त्व स्वीकारावे या पराकोटीच्या ध्येयवादाने प्रकाश राठोड यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. प्रा. प्रकाश राठोड यांनी बाबासाहेब आंबेडकर हेच त्यांच्या ग्रंथलेखनाचे प्रमाणशात्र आहे अशी स्पष्ट कबुली दिली आहे. क्रांतीच्या बीजाक्षरांचा जन्मच मुळात बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पंदनामधून झाला आहे. बालपणात त्यांच्या गालावर ओघळणार्या अश्रूंनी त्यांच्या हृदयात स्पंदने ध्वनीत केलीत आणि क्रांतीचा जन्म झाला. तेव्हापासून धम्मस्वीकारापर्यंत प्रमाणशात्राच्या संहितेचे काम त्यांनी केले. 22 प्रतिज्ञा त्या संहितेची प्रास्ताविका आहे. त्या प्रमाणशात्राचे नाव बाबासाहेब आंबेडकर असे आहे. या अनुषंगाने काही गोष्टी लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रमाणशात्रामधील संहितेचे संशोधन होत नाही. प्रमाणशात्र हा केवळ शब्द नव्हे; ती जाणीव आहे. ते विज्ञान आहे. ती संवेदना आहे. वेदना आहे. संवेदनशीलता आहे. प्रतिभालय आहे. ऊर्जालय आहे. उजेडालय आहे.
त्यातून उफाळलेला ज्वालामुखी कधी कधी मरणे उधळतो. पृथ्वीच्या गर्भाशयातून आलेला प्रत्येक क्रांतस्वर प्रमाणशात्राच्या स्वीकारामुळे कधी दावानल होतो. ज्यांनी जात सांभाळली ते या दावानलमुळे जळून राख झालेत. ज्यांनी जातीचे निर्मुलन केले ते उजळून अभ्रंकष झालेत. मरणाच्या जबडय़ातून हात घालून जीवन काढणारे सर्जनशील श्वासजन्मा डॉ. यशवंत मनोहर यांच्या प्रज्ञानाच्या कुशीतून प्रकाश राठोड या प्रतिभावंताचा जन्म झाला. त्यांच्या मेंदूत जाणिवांचे मानसशात्र विकसनशील झाले आणि या प्रक्रियेतून अपूर्णत्वाची अवस्था धारण केलेल्या विद्रोहाचा जन्म झाला. प्रकाश राठोड लेखक झाला. हा ग्रंथ या लेखकाने अपूर्णत्वाच्या विद्रोही नीतीशात्राचा तयार केलेला शब्दकोश ठरावा असा आहे. या शब्दकोशात परिवर्तनाच्या विरहात राहणार्या रातआंधळ्यांना उपयोगी पडतील अशा अनेक सौंदर्यशब्दांचा समावेश तर आहेच परंतु या शब्दांचे सहयोगी शब्दही त्यात आहेत. त्यांचे हे चारित्र्य अपूर्णत्वाची साक्ष देणारेच आहे. प्रकाश राठोड यांनी अपूर्णत्वाचा विद्रोही वसा पत्करला आहे. त्यामुळेच हा लेखक असा शब्दकोष नव्हे सौंदर्यकोश तयार करु शकला असे या निमित्ताने नोंदवावेसे वाटते आणि प्रकाश राठोड यांनी त्यांच्या लेखकपणाचा अंत होईपर्यंत अपूर्णांकाच्या मनसशात्रीय वसाहतींशी मैत्री करावी असेही सूचवावेसे वाटते. या कामासाठी दिवसानुगणिक नव्याने उगवणारा सूर्य उजेडाची रचना करण्यासाठी बळ देवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. समिक्षक – प्रमोद वाळके नागपूर. मो. 9096819438