होळी हा सण बंजारा समाजात मोठय़ा उत्साहाने साजरा करतात. होळीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी युवक आणि तांडय़ातील ज्येष्ठ नागरीक तांडय़ाच्या मुख्य नायकाच्या घरी जमा होतात. होळी साजरी करावयाची आहे असा एकमुखी ठराव मांडतात नायक त्याला संमती देतो. नायक मुखिया (बांधवांना) कोणतीही अनुचित घटना आपल्या हातून घडू न देण्याची काळजी घ्या, मालमत्तेचे नुकसान करु नका, भांडणे शक्यतोवर टाळा, दारु प्यायची नाही असा मनापासूनचा स्नेहाचा व अदबीचा सल्ला बंजारा बांधवांना नायक देतो. होळीची जागा निश्चित केल्यानंतर काही युवकांवर नायक होळी उभी करण्यासाठी लाकडे गोळा करण्याची जबाबदारी सोपवितो सकाळी लाकडाच्या दोन (लहान-मोठय़ा) होळ्या उभ्या केलेल्या दिसतात. भल्यापहाटे नायक आपल्या गोर बांधवासोबत होळीच्या ठिकाणी जातो आणि होळी पेटल्याचे जाहिर करतो. तेव्हाच डफांचा आवाज आसमंतात दुमदुमायला लागतो. सूर्य उगवलेला असतो. गोर बांधव सूर्याला नमस्कार करतात. होळीला प्रदक्षिण घालतात. एकमेकांच्या हातात हात घालून गोल साखळी तयार करतात. दोन वेगवेगळे गट (गोलार्धात) तयार होतात. एका गटाने गाणे म्हणायचे आणि दुसर्याने त्याच गाण्यावर ठेका उचलायचा आणि प्रथम आपले पाय हळू हळू मागे पुढे फिरवायचे प्रत्येकाचे पाय डफाच्या तालावर पडायला लागतात. रंगाची उधळण होते. तेव्हापासून होळीच्या गाण्याला खरी सुरवात होते. सकाळचे हे गाणे असे आहे.
परभाती रे राम भजोरं दुनिया..
उठ परभाती सूर्यानं हात जोडणो
उतो मुठी को दान धरम करणो…
बांधवांनो सकाळ झाली आहे. सूर्य उगवला आहे. त्याला आपण नमस्कार करुया या आणि नंतर गोरगरीबांना अन्नधान्याचे दान करुया. जसजसा गाण्याला रंग चढतो तसतशी पोटातली मनातली साचलेल गाणी ओठावर यायला लागतात गोर बंजारा नाचण्यात एवढे तल्लीन होऊन जातात की, त्यांना स्वतःचेच भान नसते. मग सुरात सूर मिळवून गाणे गातात. बघूया बंजारा समाजाची परंपरागत होळी गीते.
बार रं महिनाम, आयी रे होळी…
बार रं महिनाम आयी रं होळी
खेलारं दमेती काई खेल खेलारं होळी,
होळी खेलारं आवो रे देवो धर्मो
आपण खेला होळी ।
होळी खेलारं … भाई भाई रे
होळी खेलारं डोलेती …
काई खेल खेलारं आवो रे काका, दादा
आपण खेला होळी,
आवो रे सगा, समदी आपण खेला होळी
हे बंजारा बांधवा, तु आज मनसोक्त नाच. तुझे सर्व दुःख विसरुन तुझ्या चेहर्यावर आज हास्य फुलू दे, बर्याच प्रतिक्षेनंतर ही पहाट आली आहे. असे या गीतांचे सार आहेत. जुन्या पिढीतील गाणी बुजूर्ग मंडळी गायला सुरवात करतात. तेव्हा एक आगळाच आनंद मिळतो जुन्या पिढीतले अस्सल गाणे आपले मन वेधून घेते त्यांच्या काळातील (युवावस्थेतील) गाण्यांची आठवण होते त्यांना. गुरेढोरे चारत माळारानाच्या पायथ्याशी आपला डेरा (मुक्काम) ते जेव्हा ठोकत असत तेव्हाचे हे गाणे.
डुंगर डुंगर रे छाया रे लभान …
तारी छायेरी चल हारे हा …
हे गोर बांधवा आपल्याला डोंगराची केवढी मोठी छाया आहे. या छायेखाली आपण आज खूप खूप नाचूया लेंगी म्हणू या मजा करुया युवक मंडळी यांना गेरिया म्हणतात. ते गाताना थट्टा मस्करी करीत गेरणीला कसे चिडवितात ते पाहुया आपण. मी केव्हाची तुझ्या दारात दाखल झाली आहे. माझ्यासाठी भुरिया (सोन्याची नथ) आता तुझ्या राज्यात तरी आण.
जात बणजारीयो पिळो छर
भुरीयाँ… येते.
तेवढय़ात मोहन (प्रियकर) सावधपणे केसरी रंगाने भरलेली पूर्ण पिचकारी तिच्या अंगावर संपून टाकतो. तेव्हा ती रंगाने ओलीचींब होते. ती म्हणते की
आब् मत मार रे मोहन रंग पिचकारी …
मत मार रे मोहन रंग पिचकारी
रंगेमा भिजागो मारो घुमतो घागरीया
रेशमेरी डोर मिजागी सारी
मत मार रे मोहन रंग पिचकारी …
रंगेमा भिजागी मारी लालीलाली पामडी
काचेरो घुंगटो भिजागो सारी
मत मार मोहन रंग पिचकारी …
शेवटी होळीचा हा रंग उतरत चालला आहे, गेरिया रंग दिवसभर खेळून थकले आहेत. होळीची न’शाही आता उतरत चालली आहे. आता आपण सर्वांनी होळीला अभिवादन करुन निरोप देऊ या …
होळी र भेट करावा, होळी चाली रे
राम गेरियानं छोड चाली …
गेरणीनं बोल चाली, सेगोर
भायीओं होळी न् रामराम करा !
अंगेरसाल धुमधाम करती आ…
होळी माता … ! हात जोडन
भजो रे, गोरभाई यो … !
किशन हिरामन पवार
सोमनाथपूर ता. उदगीर
मो. 9860571334
Tag: Banjara Holi, Banjara holi culture, Lamani Holi history