संत सेवालाल महाराजांच्या वास्तव्याने व ‘गराशा’च्या समाधीने पावन झालेले (गराशागड) देऊळगाव साकरशा

समुद्रात भरकटलेल्या जहाजांना समुद्र किणारा गाठण्यासाठी दिपस्तंभाची गरज असते. संसार सागरात आपली नाव किणार्याला लागण्यासाठी संताची आवश्यकता भासते. म्हणूनच संपूर्ण मानवजातीत संताला महत्त्वाचे स्थान दिल्या गेले आहे. या धरतीवर असंख्य संत महात्मे होऊन गेले. त्यापैकीच ईश्वराच्या दुताप्रमाणे बंजारा समाजाला योग्य मार्गाने नेण्यासाठी या पृथ्वीतलावर एका क्रांतिसुर्याचा, देवदुताचा उदय झाला ते म्हणजे संत सेवालाल महाराज होय. महाराजांचा जन्म माघ शुक्ल पौर्णिमेस 15 फेब्रुवारी 1739 ला म्हैसूर प्रांतातील बेल्लारी जिल्ह्यात डोड्डीतांडा (गोलाल दोड्डी) ता. गुत्ती येथे झाला. आज हे ठिकाण आंध्रप्रदेश (तेलंगना)च्या अनंतपूर जिल्ह्यात आहे. त्याकाळी वयाच्या 12 वर्षापर्यंत महाराजांचे वास्तव त्या ठिकाणी होते. महाराजांचे पिता भिमा नायक 360 घरांच्या तांडय़ाचे नायक होते. त्यांच्याजवळ 3755 गायी, बैल होती. ते आपली गुरु ढोरे त्याच परीसरातील झुमती झोल जंगलात चारायला नेत असत. बंजारा बांधव त्याकाळी व्यापार उदीम करीत असत. गायी बैलाच्या पाठीवर धन धान्याची दळणवळण करीत असत त्यालाच लदेणी असे नाव होते. महाराज ज्या कुंडात आंघोळ करीत असे तो काळा कुंड आताही तेथे आहे. भिमानायक ज्या ठिकाणी बसून न्याय निवाडा करायचे तो लिंबाच्या झाडाखालील ‘कट्टा’ आजही पहावयास मिळतो. त्या ठिकाणी भव्य मंदिर उभारल्या गेले आहे. त्या ठिकाणाला सेवागड म्हणून संबोधल्या जाते. भिमानायकाने व्यापाराच्या उद्देशाने लदेणीची जबाबदारी आपल्या पुत्रांवर सोपविली. त्याप्रमाणे संत सेवालाल महाराजांनी लदेणीला प्रारंभ केला.Sant Sri Sevalal Maharaj with Nandi (Garashiya))

पहिली छावणी कृष्णा नदीच्या काठावर देण्यात आली. तेथून ते चित्रदुर्ग येथे गेले. तेथे नाना- नानीची भेट घेऊन सिमोगा, सुरगोडनकोप्पा, शिरसीकोटा, मंगलोर, म्हैसूर, चेन्नापट्टन मार्गे तिरुपतीला गेले. तेथे बालाजीचे दर्शन घेऊन तेथून परत धारवाडमार्गे कोल्हापूरला आले तेथे महालक्ष्मीचे दर्शन घेऊन सातभवानीच्या सुवर्णांच्या मुर्त्या घडवून छावणीवर त्यांची पुजा-अर्चा केली तेथून नरसीतांडोर मार्गे हैद्राबादला आले. पुढे विक्राबाद जंगलाकडे गेले तेथे चाराटंचाईमुळे महाराजांच्या गायी-बैलांनी निजामाची सुडी फस्त केल्यामुळे नवाब खुप संतापला होता. त्यांनी जंगी-भंगी नायकाला बोलावून महाराजांची चौकशी केली व महाराजांना भेटीकरिता बोलावले. महाराज दरबारात गेले पण नवाबाला मुजरा घातला नाही. त्यामुळे नवाबाने विष प्रयोग केला पण कुणावरही त्याचा परिणाम झाला नाही. महाराजांसोबत त्यांचा आवडता तोळाराम घोडा व अतिप्रिय ‘गराशा’ होते त्यांनी सहज जहर पचविले. पुढे ते सिंकंदराबाद वरुन जगतीयाल जंगलात गेले. तेथे महारजांची सत्वपरीक्षा घेतल्या गेली तो तांडा आजही ‘पोरीवाळेर तांडो’ म्हणून ओळखल्या जाते. पुढे ते ‘तांढूर’ बावनबराड (चांदाबल्लारशा) येथे प्रणिता नदीकाठी थांबले नंतर खंडवा इंदौर, भोपाळ, रांची, प्रयाग, आग्रा येथे आले तेथे यमुना तिरी काही काळ थांबल्यानंतर मथुरा, वृंदावन, आग्रा-दिल्ली (सुराखंड) येथे आले. तेथे भमीयासोबत युद्ध झाले त्यात महाराजांनी भमीयाचा पराभव केला. महाराजांना दिल्लीला इंग्रजाचा मांडलीक नवाब गुलाबखॉन सोबत महसुल (कर) भरण्याबद्दल युद्ध करावा लागला. त्यात त्या नवाबाचा पराभव झाला. महाराज अन्न-धान्याचे मोठे व्यापारी होते. 1760-61 मध्ये पाणीपथची लढाई झाली. तेव्हा जर मराठय़ांनी महाराजांना रसदीसाठी मदत मागीतली असती तर अहमदशा अब्दाली पाणीपतचे युद्ध हारले असते. परंतू हरीयानाचे आलासिंग बंजारा यांनी मराठय़ांना थोडीफार रसद पोहचविल्यामुळे मराठे काही काळ लढू कशले. नवाब गुलाबखॉनच्या पराभवानंतर ते माळवाप्रांत, चिंतोडगड पाहून नर्मदा किनारी छावणी दिली. पुढे खरगोन, बुर्हानपूर, गावीलगड, परतवाडा, कारंजा (लाड) माहूरगड येथे पैनगंगेच्या काठावर छावणी दिल्या गेली तेथील वास्तव्यानंतर उनकेश्वरच्या जंगलात एका जखमी मोराला महाराजांनी जीवदान दिले तेथून पुढे तेलंगनाकडे, निर्मलच्या जंगलातून मार्गक्रमन करत लदेणी आमसूर, बीलोली, मुखेड, तेरणाकाठ, तुळजापूर, पंढरपूर, मंगळवेढा, विजापरू आदी जंगलातून बेल्लारी (गोलालदोड्डी) ला पोहचले.

आपल्या जन्मगावी काही काळ थांबल्यानंतर पुन्हा लदेनी मार्गस्थ झाली तेथून प्रथम ते हैद्राबादला गेले तेथून अदिलाबाद मार्गे नागपूर, अकोला, धुळे मार्गे मुंबई प्रांत तेथून परत मीठ-मसाले घेवून लदेणी कल्याण, भिवंडी, कसाराघाट, नंदगाव, लिंबगाव, नासिक, औरंगाबाद, बुलढाणा, नागपूर तेथून कारंजा (लाड), माहूरगड मार्गे, हैद्राबाद जात असत काही काळ गावी राहल्यानंतर महाराजांनी धारवाड, मुधोळ, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, भालकी, उदगीर, कंधार, नांदेड, कळमनुरी, हिंगोली, जिंतूर तळणी मार्गे देऊळगाव साकर्शा येथे आले तेथे काही काळ वास्तव्य असतांना एक दुःखद घटना घडली. महाराज पुढे सुराखंडला जाणार होते. परंतू ते पुढे जाऊ शकले नाही. तेथून परत महेकर, वाशिम, पुसद, धुंदीमार्गे रुईगडला गेले काही काळ वास्तव्यानंतर महाराजांनी जगाला अखेरचा निरोप दिला. नंतर महारजांना पोहरागडला समाधी देण्यात आली. रुईगडला महाराजांचे भव्य मंदिर उभारले असून पोहरागड तर संपूर्ण बंजारा बांधवांची ‘काशी’ ठरलेली आहे. संपूर्ण भारतातील बंजारा बांधव त्यांना श्रद्धास्थान मानतात. संत सेवालाल महाराज भारतभ्रमण करत असतांना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा ता. मेहकर या ठिकाणी महाराजांची छावणी असतांना पुढील संकटाची चाहूल देणारा, मर्यामायाडीची कोथळी आपल्या पाठीवर घेऊन लदेणीच्या सर्वात समोर चालणारा महाराजांचा अतिप्रिय ‘गराशा’ ईसाईमाता (मर्यामा) टेकडीच्या पायथ्याशी आंजनाच्या झाडाखाली स्वर्गस्थ झाला. ‘गराशा’ची समाधी त्याच ठिकाणी बसून, टेकडीच्या माथ्यावर स्वतः सेवालाल महाराजांनी प्राणप्रतिष्ठा केलेल्या मर्यामाची मुर्ती महाराजांनी लावलेल्या लिंबाच्या झाडाखाली पहावयास मिळते. नवसाला पावणारी व सर्वांना साई होणारी देवी म्हणून पंचक्रोशीतील भक्तगन त्या मातेला ‘ईसाइ माता’ म्हणून संबोधतात. दर मंगळवारला आपले नवस फेडण्यासाठी परिसरातील भक्तगण त्याठिकाणी येत असतात. पोळ्याच्या दुसर्या दिवशी शेतकरी बांधव आपल्या सजलेल्या बैलासह तेथे दर्शनासाठी येतात त्या दिवसाला ‘बडगा’ असे म्हटल्या जाते. फाल्गून महिण्यात होळीच्या आदल्या दिवशी येथे खूप मोठी यात्रा भरत असते.

पंचक्रोशीतील बंजारा बांधव आपआपल्या नायक कारभारीसह आपले पारंपारिक नृत्य (लेंगी) सादर करण्यासाठी बंजारा बांधव भगीनी तेथे हजारोंच्या संख्येने येत असतात. मोठय़ा उत्साहात होळी उत्सव साजरा केल्या जातो. दिवसभर चालणार्या होळी नृत्यानंतर सायंकाळी महाप्रसादाचे वितरण केले जाते. अजिंठय़ाची पर्वतरांग, उतावळी व लेंडी नदीच्या संगमावर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला परीसर अतिशय रमणिय आहे. ज्या आंजनाच्या झाडाला महाराज आपल्या नंदीला (गराशाला) बांधत असे त्या आंजणाच्या झाडाला दोरखंडाचे व्रप दिर्घकाळपर्यंत टिकून होते. त्या झाडाच्या बाजुलाच ‘गराशा’ची समाधी आहे. बाजुला संतसेवालाल महाराजांचे पुरातन मंदीर असून नविन भव्य मंदीराचे काम पूर्णत्वास येत आहे. त्या रमणीय ठिकाणी गेल्यावर असे वाटते की आपण एखाद्या पर्यटन स्थळावर आलो आहे. एवढा निसर्गानी नटलेला, टेकडीच्या मागे पुढे मोठ मोठे तलाव आहे. गराशाच्या समाधीने व महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला हा भुप्रदेश उतावळी प्रकल्पाने सुजलाम सुफलाम झालेला आहे. संत सेवालाल महाराजांनी त्यांच्या वास्तव्याच्या वेळेस सतत भेडसावणार्या पाणीटंचाईमुळे अंगुली निर्देश करुन पाण्याचा त्रोत दाखवला व पिण्याच्या पाण्याची गरज भागविली ती विहीर आजही सरस्वती आश्रम शाळेच्या परिसरात आहे. कितीही पाण्याचा दुष्काळ पडला तरी तेथे पाण्याची कमतरता भासत नाही. या परीसरातील भक्त गणांची तेथे नितांत श्रद्धा असून मंदीराच्या व तिर्थक्षेत्राच्या विकासाकडे सर्वाचे लक्ष आहे. पूर्वी या संस्थानचा कारभार रायसिंग भगत पाहत होते. हे संस्थान पंजीकृत असून या इसाई माता (जगदंबा) संस्थानचे रजिस्ट्रेशन 1969 मध्ये झाले आहे. 778/अ नोंदणीक्रमांक असलेल्या संस्थानचे अध्यक्ष रामदास महाराज असून विश्वस्थ मंडळाच्या सर्व विश्वस्तांकडून ह्या संस्थानचा कारभार चालतो. तांडय़ातील, गावातील व पंचक्रोशीतील 150 च्या वर तांडय़ातील भक्त गन येथे दर्शनासाठी येत असतात व संस्थानला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य सुद्धा करतात. ह्या तिर्थखेत्राचा पाहिजे तसा विकास झालेला दिसत नाही. पाहिजे तेवढय़ा सुखसोयी तेथे उपलब्ध नाही. मेहकर व खामगाव वरुन 40 कि.मी. अंतरावर असलेल्या ईसाइ माता संस्थानच्या विकासाकडे शासन प्रशासनासोबतच स्थानिक राजकीय नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी व समाजबांधवांनी लक्ष घालून तिर्थक्षेत्राचा विकास करावा व 4 मार्च 2015 ला होणार्या होळी महोत्सवात सहभागी व्हावे एवढीच नम्र विनंती.

विलास राठोड
अध्यक्ष, भारतिय बंजारा कर्मचारी संस्था,
अमरावती विभाग
सेवागड प्रियदर्शनी कॉलनी,
कारंजा (लाड) जि. वाशिम मो. 9423847196