हिमायतनगर (प्रतिनिधी) – देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षाचा कालावधी होत असला तरी दर्या- खोर्यात राहणार्या बंजारा समाजाला अद्याप न्याय मिळत नाही. महाराष्ट्रासह सर्वच राज्यात बंजारा बोली भाषा एकच असून काही राज्यात समाजाला भरपुर सवलती मिळत असतांना महाराष्ट्रात मात्र त्या सवलती पासुन बंजारा समाज वंचीत राहत आहे. समाजाला न्याय देण्यासाठी बंजारा युवा टायगर फोर्स या संघटनेची स्थपना करण्यात आली असून तालुक्यातुन समाज बांधवांनी समाजाच्या हितासाठी या संघटनेच्या पाठीशी आपले बळ द्यावे, असे आवाहन पंचायत समितीचे सदस्य तथा बंजारा युवा टागयर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष बालाजी राठोड यांनी केले. हिमायतनगर येथे 21 जानेवारी रोजी समाज बांधवांच्या बैठकित पुढे बोलतांना बालाजी राठोड म्हणाले की, बंजारा समाजाची आज व्यथा कोणीही ऐकत नाही. समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराविरूध्द आवाज उठविण्यासाठी बंजारा टायगर फोर्स आपल्यासाठी एक खुले व्यासपीठ आहे. या माध्यमातुन समाज संघटित करून समाजाला न्याय देण्यासाठी कमी पडणार नाही, असेही बालाजी राठोड म्हणाले. याप्रसंगी प्रकाश राठोड, प्रा.साहेबराव चव्हाण, ऍड.दिलीप राठोड, तालुकाध्यक्ष वसंत राठोड, युवा तालुकाध्यक्ष सुनिल आडे, विधानसभा संपर्क प्रमुख नारायण राठोड, चेअरमन गणेश राठोड, वायवाडीचे सरपंच मधुकर राठोड, अर्जुन धावजी आडे, प्रविण राठोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.